मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधक भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच आता एमआयएम पक्षाने महाविकास आघाडीत येण्याबाबत विचारणा केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात नवी रणधुमाळी होताना दिसत आहे. यावरून भाजपने केलेल्या टीकेला आता थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पलटवार केला आहे. भाजपचे हिंदुत्व हे केवळ राजकारणासाठी आहे. सत्तेसाठी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत गेले होते हे विसरलात का? असा सवाल करत, सरकारचा संबंध दाऊदशी जोडणे चुकीचे असून विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. येत्या २२ मार्चपासून शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत शिवसेनेचे खासदार आणि जिल्हाप्रमुख गावागावात जाऊन शिवसेनेची बांधणी करणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
शिवसेना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना
आपण लवकरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरणार असल्याचे स्पष्ट करत, दोन वर्षांवर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. आपण शिवसंपर्क अभियान गेल्यावेळीच राबवणार होतो. पण कोरोनाची लाट आली. त्यानंतर माझ्या मानेचे दुखणे उद्बवले. मात्र आता आपल्याला जोमाने कामाला लागायचे आहे. येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन
भाजपचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा. राज्यात एकामागोमाग एक घटना घडत आहेत. महाविकास आघाडीचे निर्णय लोकांपर्यत पोहोचवा. विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न करा, असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.