एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 05:25 AM2022-03-21T05:25:03+5:302022-03-21T05:25:03+5:30

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले.

cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer | एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही, ‘ती’ ऑफर शंभर टक्के भाजपचीच; उद्धव ठाकरेंची स्पष्टोक्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमआयएमसोबत युती कदापि शक्य नाही. काहीही संबंध नसताना एमआयएमने आघाडीसाठी दिलेली ऑफर शंभर टक्के भाजपकडून आली आहे. एमआयएमने ऑफर द्यायची व भाजपने टीकेचा भडिमार करायचा, हाच डाव आहे. ज्यांच्याकडून धोका आहे त्यांना बदनाम आणि नामशेष करण्याची ही चाल आहे. सर्वाधिक पाकधार्जिण्या गोष्टी भाजपच्या काळात झाल्या, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला.

शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने शिवसेना खासदार, जिल्हाधिकारी, संपर्क प्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन संवाद साधला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर होणाऱ्या टीकेचा ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. तुमची सत्तेची स्वप्ने आम्ही चिरडून टाकली म्हणून आम्ही मुस्लीमधार्जिणे असू तर मोहन भागवतांच्या विधानांचा काय अर्थ काढायचा, असा प्रश्न करत ठाकरे यांनी भागवतांची विविध विधाने वाचून दाखविली. 

मग, आता त्यांच्या नावापुढे खान लावणार का, असाही टोला लगावला. हिंदुत्वाचे बाप आम्हीच आहोत असेसुद्धा उद्या हे म्हणतील. आपला तो बाबा इतरांचे गुंड असा हा प्रकार आहे, असे ते म्हणाले. शिवसेनेला जनाबसेना म्हटले जात आहे. आपण हिंदुत्व सोडलेले नाही. औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकतात, त्यांच्यासोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा असताना उगाच हा मुद्दा काढायचा आणि आम्ही हिंदुत्वापासून दूर चाललो आहोत हे दाखवायचे. आम्ही काय मूर्ख नाही आणि भाजपसारखे सत्तेसाठी लाचारही नाही, असा टोला त्यांनी लगावला.

चित्रपटाच्या माध्यमातून उघडली आहे एक फाईल

पूर्वी इस्लाम खतरे में है म्हणायचे. आता हिंदू खतरे में है, असे नवे सुरू आहे. दरवेळी अनामिक भीती दाखवायची, इतिहासाच्या खपल्या काढल्या जात असून, हा डाव मोडून काढला पाहिजे. सध्या चित्रपटाच्या माध्यमातून एक फाईल उघडली आहे. पण, पंडितांवर अत्याचार झाले तेव्हा भाजपच्या समर्थनातील व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना शिवसेनेने विरोध केला, कारण ते जामा मशिदीत गेले होते. तेव्हा भाजप एक शब्द बोलला नाही. तेव्हा फक्त बाळासाहेबांनी सगळ्यांना अंगावर घेतले. हिटरलने प्रवक्त्यांच्या चार फळ्या केल्या होत्या. पहिली फळी त्याची सकारात्मक बाजू जनतेसमोर मांडणे, दुसरी विरोधकांना उत्तर देणे, तिसरे आरोप करणे, चौथी अफवा पसरवणे या चार फळ्या होत्या.  गोबेल्स नीती हीच भाजपची नीती आहे. दुसऱ्यांबद्दल द्वेष, भीती निर्माण करणे आणि आपणच तारणहार आहोत, हे बिंबवणे हाच प्रकार उत्तर प्रदेशात झाला.

प्रयत्न सुरूच ठेवणार - इम्तियाज जलील

एमआयएमचा प्रस्ताव महाविकास आघाडीने फेटाळला असला तरी आघाडीत येण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी रविवारी ‘लोकमत’ला सांगितले. महाविकास आघाडीसोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत चर्चा करू, असे जलील म्हणाले.

भाजपचे हिंदुत्व थोतांड आहे हे जनतेला दाखवण्याची गरज आहे. भारत-पाकिस्तान बससेवा तेव्हा वाजपेयींनी सुरू केली इथपासून न बोलावता पाकिस्तानात जाऊन केक खाणारे मोदी इथपर्यंत आम्ही सगळे बघतो आहे. मग तुम्हाला काय हिजबूल पक्ष म्हणायचे का? आम्ही असे काही म्हणणार नाही. त्यांनी भीतीचा निर्माण केलेला हा भ्रम घराघरात जाऊन दूर करायचा आहे. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री

कुणी कुठल्या पक्षासोबत जायचे हे ते स्वत: सांगू शकतात; परंतु ज्यांच्यासोबत जायचेय त्या पक्षाने तरी होकार दिला पाहिजे. हा राजकीय निर्णय महाराष्ट्रापुरता कुणी प्रस्तावित केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून असा निर्णय घेतला जाणार नाही.  - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस

अजान स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएमसोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोपही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळत आहेत. -देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते  
 

Web Title: cm uddhav thackeray said an alliance with aimim is not possible it is 100 percent of bjp offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.