मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'अर्थसंकल्प सोप्या भाषेत' या पुस्तकाचं आज उद्घाटन करण्यात आले. या उद्धघाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेत्यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या आधीच तुम्ही हे पुस्तक लिहिलं असल्याचे सांगितले. तसेच पुढील पाच-दहा वर्ष असंच आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तक लिहित राहा असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मला अर्थसंकल्प समजावा यासाठीच हे पुस्तक लिहिलं आहे. तसेच मला वाटलं नव्हतं या विषयावर बोलण्याची माझ्यावर वेळ येईल. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच माझ्यावर हे बोलण्याची वेळ आली असल्याचे देखील उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणारी प्रत्येक गोष्ट अर्थसंकल्पात मांडली पाहिजे अशी प्रथा आहे. मग माझ्या डोक्यात नेहमी विचार येतो की, इतक्या बारीक गोष्ट मांडत असू तर मग नोटबंदी हा विषय अर्थसंकल्पात येणं गरजेचं होतं की नव्हतं असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले की, पुस्तक बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस उत्तम साहित्यिक होऊ शकतात असं मला जाणवायला लागलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण सोडून लेखक व्हायला काही हरकत नसल्याचे सांगत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आता दिल्लीला जावं, ते दिल्लीला गेले तर सगळ्यात जास्त आनंद भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांना होईल असा टोला देखील अजित पवार यांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे नेतृत्व लवकरच राज्यसभेवर पाठविणार असून त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र मी दिल्लीत जाणार असल्याच्या बातम्या कुठून येताहेत ते माहिती नाही, या बातम्यांचा सोर्स काय हेही कळत नाही. पक्षाने मला महाराष्ट्रात विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.