Join us

वडेट्टीवारांना वाटलं निर्णय निश्चित झाला अन्...; लॉकडाऊनच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांनी केलं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 7:02 PM

विरोधकांनी देखील सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील गोंधळावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता.

मुंबई: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती. परंतु तासभरातच राज्यातील निर्बंध उठवण्यात आले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून  निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील असं अवघ्या काही मिनिटांतच शासनाद्वारे सांगण्यात आलं होतं. 

विजय वडेट्टीवारांनी लॉकडाऊन संदर्भात घोषणा केल्यानंतर सरकारमध्येच 'अनलॉक'बाबत एकमत नाही का, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करणं योग्य आहे, की हा श्रेयवादाचा विषय आहे, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली होती. तसेच विरोधकांनी देखील सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील गोंधळावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र लॉकडाऊनबाबत झालेल्या गोंधळावर आता स्वत: उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनीच भाष्य केलं आहे. 

एका वेबिनारमध्ये बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्यावेळी लॉकडाउन शब्द वापरला नाही, पण निर्बंध लॉकडाउनसदृश्य लागू करावे लागले. मागच्या वेळी १५ दिवस उशीर झाला. गेल्या वेळी सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागलं. सगळ्यांशी बोलण्यात वेळ गेला. त्यामुळे हे निकष लागू केले. अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे. प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. 

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती. त्यात दहावी-बारावी परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात हे निकष सूचवण्यात आले. त्यात मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं निर्णय निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर केलं. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना त्यावेळीच करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. 

शिवसेना अन् भाजपा पुन्हा एकत्र येणार का?

पुन्हा भाजपा-तुम्ही एकत्र येणार किंवा भाजप -राष्ट्रवादी एकत्र येणार अशा अफवा उठतात, तर या अफवाच आहेत का?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर कुरघोड्या असत्या तर हे सरकार चाललंच नसतं. स्थापन झालं तेव्हा मी नवखाच होतो, पण आम्ही एकमताने एकत्र आलो, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. तसेच शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकत्र येणार की नाही, असा सवाल विचारल्यानंतर त्याचं उत्तर दोन्ही पक्ष वेगळे का झाले यामध्ये आहे. एका विचाराने झालेली युती तुटली का, याचं उत्तर शोधावं लागेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती-

आमची युतीबाहेर पडण्याची इच्छा नव्हती. आमची युती २५ ते ३० वर्ष होती. आम्ही एका ध्येयाने एकत्र राहिलो. मात्र आम्ही जे केलं ते प्रामाणिकपणे केलं, असं सांगायला उद्धव ठाकरे विसरले नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्याशी आमचे कौटुंबिक नातेसंबंध होते. पंतप्रधानांशी देखील जे आमचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत, असं सांगत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं. वैयक्तिक संबंध वेगळे ठेवावेत, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेविजय वडेट्टीवारमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार