Join us

अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीवर कोणी उपकार करत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 6:07 AM

मराठी भाषा गौरव दिवस बंदिस्त सभागृहात साजरे न करता त्याचा भव्य सोहळा व्हायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अजित पवार यांनी शिवसेनेच्या शैलीत आपल्या भाषणाचा शेवट केल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, दुकानांवरील पाट्या मराठी व्हायलाच हव्यात. त्यासोबत त्या पाट्यांच्या मागे जी दुकाने, उद्योग आहेत, त्यातही मराठी माणूस हवा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले. त्यावेळी  ते बाेलत हाेते. 

मुंबईत सर्व मिळवितात आणि मराठीचा द्वेष करतात, मराठी पाट्यांना विरोध करणे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या राज्यात आपण जातो, तिथल्या भाषेचा आपण सन्मान केलाच पाहिजे. शिवसेनेने जेव्हा मराठीचा आग्रह धरला, तेव्हा संकुचितवादाचा आरोप झाला, पण आज चित्र बदलत आहे. मराठी माणसाला आपल्या न्याय मागण्यासाठीही संघर्ष करावा लागतो. अभिजात भाषेचे निकष मराठी पूर्ण करत असेल, तर तो दर्जा देऊन कोणी मराठीवर उपकार करत नाहीयेत, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सुनावले.

मुंबईत दिमाखात मराठी भाषा भवन उभे राहणार आहे. गुढी पाडव्यापासून त्याची सुरुवात होईल, असे सांगतानाच, प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव संकल्पना राबविताना बोलीभाषेचा सन्मान होईल, अशा साहित्याचाही त्यात समावेश करावा. पुढच्या वर्षीपासून मराठी भाषा गौरव दिवस बंदिस्त सभागृहात साजरे न करता त्याचा भव्य सोहळा व्हायला हवा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

भाषेचा न्यूनगंड कसा चालेल

मराठीजनांची आपल्या भाषेबद्दलची अनास्था हीच मोठी समस्या असल्याचे सांगून अजित पवार म्हणाले की, मराठी माणसे भेटली, तरी इंग्रजी-हिंदीतून बोलायला लागतात. भाषेचा असा न्यूनगंड असेल, तर कसे चालेल. भाषा केवळ ओठातून नव्हे, तर पोटातूनही यायला हवी. इंग्रजी वगैरे भाषाच अर्थाजनाच्या आहेत, हा भ्रम दूर करावा लागेल, असे सांगताना पवार यांनी जपानचे उदाहरण दिले, शिवाय साहित्य महोत्सवपेक्षा खाद्य महोत्सवाला जास्त गर्दी का होते, याचा विचार करावा लागेल, असे सांगतानाच, बोलीभाषेतील भेद दूर सारत बोलीभाषा हीच मराठी हा आत्मविश्वास जागृत करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम करावा लागेल. प्रमाण भाषेचा आग्रह न धरता, भाषेतील इतर प्रवाहांना सामावून घ्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मराठी भाषा दिनउद्धव ठाकरे