मुंबई: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज धर्मवीर चित्रपटाचा विशेष शो पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी अभिनेता प्रसाद ओकचं तोंडभरून कौतुक केलं. मी चित्रपट पाहतोय, असं एक क्षणही वाटलं नाही. इतकी जिवंत व्यक्तीरेखा प्रसाद यांनी साकारली आहे, असं ठाकरे म्हणाले.
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणाऱ्या आनंद दिघेंची भूमिका प्रसाद ओक यांनी उत्तम साकारली आहे. आनंदजींच्या लकबी त्यांनी कशा आत्मसात केल्या माहीत नाही. पण मी चित्रपट पाहतोय असं मला वाटलंच नाही. प्रसाद ओक यांनी कमाल केलीय. त्यांचे मनापासून धन्यवाद, अशा शब्दांत ठाकरेंनी प्रसाद ओकचं कौतुक केलं.
प्रत्येकानं अवश्य पाहावा असा हा चित्रपट आहे. आयुष्य जगावं कसं हे शिकवणारा एक माणूस आपल्यात होता. या चित्रपटात एक वाक्य आहे. प्रत्येक शहरात एक आनंद दिघे पाहिजे. ते वाक्य फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळी आपल्या शहरात एक आनंद दिघे असतील, त्यावेळी शहरातील गुंडापुडांच्या मनात एक धाक, दरारा असेल. तोच धाक शहरातल्या माताभगिंनींचं रक्षण करेल. निष्ठा म्हणजे काय, पक्षावरील श्रद्धा म्हणजे काय, स्वत:चं आयुष्य झोकून देणं म्हणजे काय असतं याचं उदाहरण आनंद दिघे होते, असं मुख्यमंत्री म्हणाले.
चित्रपटातील एका प्रसंगात बाळासाहेब रागावलेले दाखवले आहेत. तसा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला आहे. आनंद दिघे कधीच वेळेवर यायचे नाहीत. त्यामुळे बाळासाहेब चिडायचे. मग आनंद दिघे बाळासाहेबांसमोर शांतपणे उभे राहायचे. एक दोन वाक्य व्हायची. कशाला आलास अशी विचारणा बाळासाहेब करायचे. ठाण्यात निवडणूक आहे. उमेदवारांची यादी दाखवायला आलो आहे, असं उत्तर दिघे द्यायचे. मग बाळासाहेब एकच प्रश्न विचारायचे, भगवा फडकवशील ना? आनंद दिघे हो असं उत्तर द्यायचे. मग बाळासाहेब त्यांना जा कर, तुला पाहिजे ते, असं सांगायचे. बाळासाहेब त्या यादीला हातही लावायचे नाहीत. इतका विश्वास बाळासाहेबांचा दिघेंवर होता. पक्षावर, पक्षप्रमुखांवर दिघेंची प्रचंड निष्ठा होती. आनंद दिघे हे एक अजब रसायन होतं, अशा शब्दांत ठाकरेंनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.