मुंबई: राज्यात लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसावरून वातावरण तापलं आहे. भाजप, मनसेनं घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेना अडचणीत येत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर शरसंधान साधलं. काही लोक झेंडे बदलत असतात. त्यांचे खेळ महाराष्ट्रानं पाहिले आहेत, असं टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मुख्यमंत्री ठाकरेंनी नरेंद्र मोदींबद्दलचाही एक किस्सा सांगितला.
गोध्र्यातील दंगल आणि त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेला हिंसाचार या संदर्भातली एक आठवण ठाकरेंनी सांगितली. 'गुजरातमध्ये दंगल झाली त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री होते. दंगलीनंतर मोदी हटाओ मोहीम सुरू झाली. त्यावेळी लालकृष्ण अडवाणींनी बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा केली होती. मोदींना हटवायला हवं का, अशी विचारणा अडवाणींनी केली होती. त्यावर त्यांना हात लावू नका. मोदींना हटवलं, तर गुजरात हातातून गेले, असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता,' असा किस्सा ठाकरेंनी सांगितला.
राज ठाकरेंच्या भूमिकेवरून टोलेबाजीमनसेप्रमुख राज ठाकरेंनी सध्या आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. मशिदींवरील भोंगे हटवा, अन्यथा त्या मशिदींसमोर लाऊड स्पीकरवर हनुमान चालिसा लावू, अशी भूमिका राज यांनी घेतली आहे. यावर भाष्य करताना काही लोक झेंडे बदलत राहतात. आधी ते अमराठी लोकांवर हल्ले करायचे आणि ते हिंदू नसलेल्यांवर हल्ले करत आहेत. मार्केटिंगचा जमाना आहे. एक गोष्ट चालली नाही, तर दुसरी, असा प्रकार सुरू आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राज यांना टोला लगावला.