Join us

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे'; देवेंद्र फडणवीसांनी टोचले कान

By मुकेश चव्हाण | Published: December 15, 2020 4:14 PM

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही.

मुंबई: राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विज बिलाच्या मुद्द्यावरुन सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. सरकारने राज्यातील जनतेची सरळसरळ फसवणूक केली आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

आज सभागृहात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत, रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्ताव, मराठा आरक्षण, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जोरदार गदारोळ माजला. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख सन्मानानेच झाला पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी कंगाना आणि अर्णब गोस्वामी यांचे कान टोचले आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तसेच देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

आमच्या योजनांची नावं बदलून तेच पुढे नेलं जात आहे- देवेंद्र फडणवीस

2013 साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरातील मंत्र्यांची एक कमिटी स्थापन केली होती. त्यासमितीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील होते. त्या समितीनं दिलेल्या अहवालात अत्यावश्यक सेवा कायद्यातील तरतुदींमुळे शेती क्षेत्रात गुंतवणूक होण्यात अडचणी होत असल्याचे नमूद असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच तुमच्या वर्षभराच्या कार्यकाळाच्या कामकाजाचा अहवाल सांगणाऱ्या पुस्तकात आमच्याच काळातील कामं का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. 

आमच्या योजनांची नावं बदलून तेच पुढे नेलं जात आहे. आमची घोषणा होती हरघर मोदी, घरघर मोदी, त्याची कॉपी ग्राम विकास विभागाने करत हरघर गोठे, घरघर गोठे असं केले. तुम्ही काहीतरी कल्पकता वापरा, आमचं कशाला कॉपी करताय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. 

अजित पवारांनी स्वीकारलं चँलेज

पुरवणी मागण्या, हक्कभंग प्रस्ताव अशा विविध विषयांवर सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, आमदारांच्या वाहन चालकांना पैसे दिले नाहीत, दिव्यांगाचे पैसे दिले नाहीत. परंतु मुख्यमंत्री कार्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पैसे दिले असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला. त्यावेळी अजित पवार उत्तर देण्याचा प्रयत्न करत असताना माझ्या भाषणात अडथळा आणतो तो पुन्हा कधी निवडून येत नाही असं मुनगंटीवार म्हणाले. त्यावर तुमचं आव्हान मी स्वीकारतो, मला पाडून दाखवा असं चॅलेंज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुधीर मुनगंटीवारांना दिलं.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र सरकारकंगना राणौतअर्णब गोस्वामी