मुंबई: माझं नाव राहुल गांधी आहे. राहुल सावरकर नाही. त्यामुळे मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भाजपाकडून केली जाणारी माफीची मागणी फेटाळून लावली. यावरुन देशात मोठा वादंग निर्माण झाला आहे. शिवसेनेनं राहुल यांना सूचक इशारा दिल्यानंतर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी राहुल यांना जाहीरपणे मुंबईत जोडे मारावेत, असं म्हणत त्यांचा संताप व्यक्त केला आहे.राहुल यांच्या विधानावर भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेनंदेखील राहुल यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. त्यावर भाष्य करताना रणजित सावरकरांनी त्यांचा संताप तीव्र शब्दांत मांडला. 'सावरकरांवर टीका करणाऱ्यांना जोडे मारायला पाहिजे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. राहुल गांधींचं नाव घेऊन त्यांनी हे विधान केलं होतं. त्यामुळे ते मारतील, शिवसैनिक मारतील. त्यामुळे मला विश्वास आहे. माझी अपेक्षा आहे की त्यांनी त्यांचे शब्द पाळावेत आणि राहुल गांधींना मुंबईमध्ये' जोडे मारावेत', असं रणजित सावरकर म्हणाले. राहुल गांधींचा समाचार घेणाऱ्या रणजित सावरकरांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यावरदेखील सडकून टीका केली. 'देश स्वतंत्र होण्याच्या एक वर्ष आधीच सत्तेच्या मोहाने नेहरूजींनी व्हॉईसराय मंडळाचे सदस्यत्व मिळण्यासाठी भारताचे सम्राट किंग जॉर्ज (सहावे) आणि त्यांचे उत्तराधिकारी आणि वंशज यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती,' असा सनसनाटी आरोप रणजित सावरकर यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं घृणास्पद कृत्य करण्याचा विचार स्वप्नातदेखील केला नसता, असंदेखील ते पुढे म्हणाले.
उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे राहुल गांधींना जोडे मारावेत; सावरकरांच्या नातवाची संतप्त भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 9:16 PM