मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती गेले काही दिवस ठीक नव्हती. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनासाठीही त्यांना हजेरी लावता आली नाही. मुख्यमंत्री आजारी असतील तर त्यांच्या जागी राज्याचे प्रमुख म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राज्याचा प्रमुख करा, असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुचवलं होतं. तशातच १ जानेवारीला दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी मुंबईकरांना एक गिफ्ट दिलं. मुंबईतील ५०० स्वेअर फुटांखालील घरांवरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयाला अखेर आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आणि निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचेही आदेश प्रशासनाला दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांना काही बाबींवरून सुनावलं. पण भाजपनेही त्यावर पलटवार केला.
लोकांना वचन देऊन फसवणारे अनेक जण आहेत. पण आम्ही कधीच फसवत नाही. अनेक जण येतात आणि असे बोलायचे असते, असे बोलून निघून जातात. आम्ही मात्र मुंबईकरांना वचन देतो आणि वचनपूर्तीही करतो, असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले. त्यातील 'लोकांना वचन देऊन फसवणारे अनेक जण आहेत', या वाक्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. असा प्रकार करण्यात आपणच अग्रस्थानी येणार. कारण आपण २०१९ विधानसभेच्या निवडणूकीत काय भाषणे केली आठवत असतीलच. कॅाग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात जोरदार भाषण करीत युतीच वचन लोकांना दिल आणि सत्तेसाठी याच महाराष्ट्रातील लोकांना फसवलं, असं ट्वीट त्यांनी केलं.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात कोरोनाबाबतही सूचक वक्तव्य केलं. 'अनेकांना वाटले असेल की मी टीव्हीवर बोलत आहे याचा अर्थ मी कोरोनाबद्दल बोलेन. पण तसं मूळीच नाही. मुंबईबद्दलचा निर्णय जाहीर करताना मला व्यक्तीश: अस्सल मुंबईकर, शिवसेनेचा पक्षप्रमुख आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आनंद होत आहे. मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असताना आपली जी काही पाळेमुळे आहेत, ती विसरून चालणार नाही. कोरोनाबद्दल बोलायची तशी आवश्यकता लागली तर काही दिवसांनी नक्कीच बोलेन', असं मुख्यमंत्री म्हणाले.