पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. आगीत सुदैवाने आतापर्यंत तरी कोणतीही जीवीतहानी झालेली नाही, आग विझविण्याचं काम अजूनही सुरू आहे, अशी माहिती देतानाच विरोधकांनी केलेल्या आरोपांवरही मुख्यमंत्र्यांनी शरसंधान केलं.
"सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत सुदैवाने अजून तरी कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. कोरोनाची लसही सुरक्षित असून जिथं बीजीसी लस तयार केली जाते तिथं ही आग लागली आहे. आगीवर संपूर्णपणे नियंत्रण मिळू द्यात मग सगळी माहिती समोर येईल. त्याआधीच तर्कवितर्क लावणं योग्य नाही. विद्युत बिघाडामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे", असं मुख्यमंत्री म्हणाले.
सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग विझविण्याचं काम शेवटच्या टप्प्यात आहे. मी स्वत: तेथील माहिती जाणून घेत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
विरोधकांच्या आरोपांना जशासतसं प्रत्युत्तरसीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीवरुन भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही आग लागली की लावली असा सवाल उपस्थित केलाय. याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं. विरोधकांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट हातच जोडले. "जाऊ द्या हो! त्यांचं ज्ञान अगाध आहे. म्हणून त्यांना सगळी गुपितं कळतात. सर्जिकल स्ट्राइक कधी होणार हेही त्यांना माहित होतं. अशा लोकांनी खरंतर आमच्या ज्ञानात भर घालायला हवी. त्यांना आधीच माहिती मिळत असेल तर आम्हाला सांगायला हवी", असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.
"सीरमच्या इमारतीला आग लागली की लावली?": प्रकाश आंबेडकर
"विरोधकांना संयमाची लस टोचण्याची गरज"सीरमच्या आगीमागे घातपात असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केला आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. "सीरमला लागलेली आग विझण्याआधीच आगीवरुन राजकारण करणाऱ्यांना खरंतर संयमाची लस टोचण्याची गरज आहे. आग पूर्णपणे विझू द्या. अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांचं काम करू द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले.