तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:33 PM2021-05-23T13:33:00+5:302021-05-23T13:33:47+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लहान मुलांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली

CM Uddhav Thackeray Speech during Special Program on prevention of COVID in children by Maharashtra Pediatric Taskforce | तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं? मुख्यमंत्री ठाकरेंनी दिला कानमंत्र

Next

कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लहान मुलांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि राज्य सरकार करत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली. 

"तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

रोगापेक्षा इलाज भयंकर होऊ नये
लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधं आणि उपचारांबाबतही उद्धव ठाकरे यांनी तज्ज्ञांसमोर आपलं मत मांडलं. "गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे", असा कानमंत्र दिला. 

कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवत आहोत. लसीकरणाच्या बाबतीतही मी परत सांगतो की १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे, अशी माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी टास्कफोर्समधील सर्व सदस्य आणि डॉक्टरांची आभार देखील व्यक्त केले. कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 
 

Web Title: CM Uddhav Thackeray Speech during Special Program on prevention of COVID in children by Maharashtra Pediatric Taskforce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.