मुंबई: स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या नावानं दिला जाणारा पहिलावहिला पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. या सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच कालवधीनंतर एकाच मंचावर दिसतील अशी चर्चा होती. मात्र मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. पण मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोहळ्याचं आमंत्रण दिलं. मात्र मुख्यमंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं कळतं.
मुख्यमंत्री सहकुटुंब आजींच्या भेटीला जाणारमातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करू असं आव्हान खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी दिलं होतं. त्यानंतर काल दिवसभर शिवसैनिक मोठ्या संख्येन उपस्थित होते. त्यात एका ८० वर्षांच्या आजींचादेखील सहभाग होता. चंद्रभागा शिंदे असं या आजींचं नाव. काल मुख्यमंत्र्यांनी या आजींची विचारपूस केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री सहकुटुंब या आजींच्या भेटीसाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी परळला जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे संध्याकाळी सहाच्या सुमारास परळला जातील. चंद्रभागा आजींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी ठाकरे कुटुंब परळला जाणार आहे. पंतप्रधान मोदी मुंबईत येत असल्यानं मुख्यमंत्री त्यांच्या स्वागताला विमानतळावर जातील असं म्हटलं जात होतं. मात्र मुख्यमंत्री सहपरिवार चंद्रभागा आजींच्या भेटीला जाणार आहे.
शिवसेनेच्या फायर आजींची जोरदार चर्चाराणा दाम्पत्यानं थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान दिल्यानंतर शाखा क्रमांक २०२ च्या शिवसैनिक असलेल्या चंद्रभागा आजी मातोश्राबाहेर ठाण मांडून बसल्या. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येऊनच दाखवावं. आम्ही गुपचूप येऊ आणि हनुमान चालिसा म्हणून जाऊ, असं राणा दाम्पत्याला वाटलं असेल. पण तसं काही आम्ही होऊ देणार नाही, असं चंद्रभागा आजी म्हणाल्या. आजींचा उत्साह पाहून त्यांच्यासोबत युवासैनिकांनी 'राणा दाम्पत्य कायर है, आजी आमची फायर है' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.
रणरणत्या उन्हात ठिय्या देऊन बसलेल्या चंद्रभागा आजींची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारपूस केली. त्यांना काळजी घेण्यास सांगितलं. बाळासाहेब ठाकरेंपासून मी शिवसेनेत आहे. पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं आहे. मातोश्रीला कोणी आव्हान देत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर येण्याची हिंमत करूनच दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर बोलवून विचारपूस केल्यानंतर आजींनी 'झुकेगा नहीं' असं म्हणत माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती.