मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 07:49 PM2021-08-11T19:49:28+5:302021-08-11T19:50:50+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहे.

CM Uddhav Thackeray took 5 important decisions in the cabinet meeting today | मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज उद्धव ठाकरेंनी घेतले ५ महत्वाचे निर्णय; राज्य सरकारने केले जाहीर

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अनाथांना १ टक्का आरक्षणाचाही निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटरद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले- 

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह योजनेत राज्याचाही सहभाग-

केंद्र पुरस्कृत “नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह” योजनेत राज्य सरकारही सहभागी होणार आहे. राज्यात अशा पद्धतीने वसतिगृह चालविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापुर्वी ही योजना केंद्र आणि स्वयंसेवी संस्था यांच्या 75:25 अशा सहभागातून राबविण्यात येत होती. या योजनेच्या केंद्र शासनाच्या 22 नोव्हेंबर 2017 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी/वसतीगृहाची इमारत भाडे तत्वावर उपलब्ध करुन अनुदान देण्याची सुधारित योजना राबविण्यात येणार आहे. 

यात केंद्र : राज्य : स्वयंसेवी संस्था यांच्या हिश्श्याचे प्रमाण अनुक्रमे 60:15:25 असे राहणार आहे. असे वसतिगृह योजना राबविण्यास इच्छूक संस्थेला त्यांच्या इमारत भाडयापोटी वार्षिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.  वसतिगृह प्रवेश आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत नियम, अटी-शर्ती या पुर्वीच्या योजनेप्रमाणेच राहतील. 

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरणार-

नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील सरळ सेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

अनाथांच्या एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली-

अनाथ मुलांना शिक्षण व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याच्या धोरणात बदल करून आता तीनही वर्गातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षण देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अनाथांचे ‘अ’ ‘ब’आणि ‘क’ अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करुन तिन्ही प्रवर्गातील अनाथ मुलांना शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण लागू करण्यास मान्यता देण्यात आली. 

1) अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून लागू करण्यात आलेल्या 1 टक्का समांतर आरक्षणाऐवजी दिव्यांगांच्या धर्तीवर 1 टक्का समांतर आरक्षण लागू करण्यास मान्यता देण्यात आली
2) अनाथ आरक्षणासाठी पदांची गणना पदभरतीच्या तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी एकूण पदसंख्येच्या 1% इतकी लागू करण्यास  मान्यता देण्यात आली.
3) अनाथ  आरक्षणासाठी अर्ज कऱणा-या उमेदवारास अनुसुचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित केलेले वय, शैक्षणिक शुल्क,  परीक्षा शुल्क, किमान गुणवत्ता पात्रता इत्यादी निकष लागू करणार.
4) अनाथ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक  शैक्षणिक शुल्काची संपूर्ण  प्रतिपुर्ती तर उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर) शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनाथ मुलांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमधून करणार.

अमरावती जिल्ह्यातील 6 गावांना सिंचनाचा लाभ होणार; राजुरा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी सुधारीत मान्यता-

अमरावती जिल्ह्यातील राजुरा बृहत  लघु  पाटबंधारे  योजनेंतील मौजे राजुरा (ता. चांदुर बाजार) येथील लघु पाटबंधारे धरणात पाणी आणणे व उजव्या कालव्याद्वारे सिंचन करण्याच्या प्रकल्पासाठीच्या 193 कोटी 81 लाख खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. 

प्रकल्पाव्दारे अमरावती  जिल्ह्यातील 6 गावांतील एकुण  1000 हे. क्षेत्रास सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. हा प्रकल्प राजुरा गावाजवळील राजुरा  नाल्यावर प्रस्तावित असून खारपाण पटयातील योजना आहे. यामध्ये बेलोरा गावाजवळ काशी नदीवर वळण बंधारा बांधुन त्यातुन फिडर कालव्याव्दारे (पुरवठा कालवा) प्रस्तावित राजुरा बृहत लपा धरणात पाणी आणण्यात येणार आहे. तसेच त्यातून उजव्या कालव्याव्दारे (PDN) सिंचन करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता 5.989 दलघमी इतकी आहे. 

या योजनेस विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने 2008-09 मध्ये 44 कोटी 79 लाख रुपयांच्या तरतुदीस मुळ प्रशासकीय मान्यता दिली होती. या प्रकल्पाचे सन 2017-18 च्या दरसूचीवर आधारीत रु.193.81 कोटी इतक्या किंमतीस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेची शिफारस राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती, नाशिकने केली होती. त्याला विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार खास बाब म्हणून या प्रकल्पाच्या खर्चाच्या तरतुदीस सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसहभागातून राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन- 

भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याचे “राज्यगीत” तयार करण्यात यावे अशी सूचना केली आहे. त्याअनुषंगाने राज्यगीताची निर्मिती करण्यावर देखील चर्चा करण्यात आली.  या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण इत्यादी विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने 15 ऑगस्ट 2023 पर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात हे सादरीकरण करण्यात आले. इंडिया@ 75 या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून, स्वातंत्र्य लढा, संकल्प, संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याभोवती गुंफलेली असेल. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असतील. 

स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करणे, त्यांच्या निवासस्थानी भेट देणे, संबंधित जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील  निगडीत महत्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे सादरीकरण, हेरिटेज वॉक, सायकल वॉक या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात येईल.

Web Title: CM Uddhav Thackeray took 5 important decisions in the cabinet meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.