मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीकोरोनाची लस घेतली आहे. ठाकरेंनी मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीदेखील कोरोनाची लस घेतली. उद्धव ठाकरेंनी कोरोना लस घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. याबद्दल कोणत्या उपाययोजना करण्यात येणार, असा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री ठाकरेंना विचारला. त्यावर काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागले. नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे कठोर निर्णय घ्यावा लागेल. पुढील एक-दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहिल्यास नाईलाजानं लॉकडाऊन करावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतल्या जे. जे. रुग्णालयात कोरोनाची लस घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'कोरोनाची लस अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी मनात कोणतीही बाळगू नये. मनात कोणताही किंतु-परंतु आणू नका. लस घेण्यास पात्र ठरल्यानंतर निश्चिंतपणे लस घ्या. त्यासोबत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक असलेले नियमदेखील पाळा,' असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.