मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी सकाळी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. पाठ आणि मानेच्या दुखण्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. ज्येष्ठ अस्थिविकारतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासण्यांनंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात रुग्णालय प्रशासन कोणतेही मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती संदर्भातील अधिकृत माहिती मुख्यमंत्री कार्यालय देणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.