Navratri 2021: “कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे”; CM उद्धव ठाकरेंची मुंबादेवीचरणी प्रार्थना, सहकुटुंब घेतले दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 10:30 AM2021-10-07T10:30:55+5:302021-10-07T10:34:08+5:30
CM Uddhav Thackeray Navratri 2021 wishes: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले.
मुंबई: कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे अखेर घटस्थापना, नवरात्रीच्या (Navratri 2021) शुभ मुहुर्तावर खुली झाली. राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यातच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेनिमित्त आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.
कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून, आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वांनी पार पाडली पाहिजे. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे की, आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या. (CM Uddhav Thackeray gives navratri 2021 wishes)
शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था
सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले.
सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नवरात्रोत्सवानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा. येणारे दिवस जगत जननी मातेच्या पूजेसाठी स्वतःला समर्पित करणार आहोत. नवरात्री प्रत्येकाच्या जीवनात शक्ती, चांगले आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो, या शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. दुसऱ्या एक ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी देवी शैलपुत्रीच्या प्रार्थनेचा एक व्हिडिओ शेअर केला असून, नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि आम्ही देवी शैलपुत्रीला प्रार्थना करतो. ही स्तुती समर्पित करतो, असे म्हटले आहे.
दरम्यान, गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर परळी वैजनाथ या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मंदिराचे दरवाजे उघडत सर्वप्रथम दर्शन घेतले.