Maharashtra Lockdown: राज्यात आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केली जात आहे. पण राज्यातील ऑक्सिजन साठ्यात फार काही विशेष वाढ झालेली नाही. राज्यात कोविड रुग्णांसाठी ७०० मेट्रीक टनांपर्यंत ऑक्सिन जेव्हा लागेल तेव्हा कदाचित आपल्याला राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मुंबईतील सांताक्रूझ येथे आज खाल बाल कोविड काळजी केंद्राचं उदघाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
"जनतेच्या सेवेसाठी आज दोन आरोग्यसेवेचं लोकार्पण करण्यात आलं. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात इतर राज्यांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याचं दिसून येत आहे. आपल्याकडे याचा धोका वाढणार नाही याची आपण काळजी घेतच आहोत. त्याच पार्श्वभूमीवर लहान मुलांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना रुग्णालयाच्या भयावह वातावरणाला समोरं जावं लागू नये यासाठी अशी विशेष काळजी केंद्र उभारली जात आहेत", असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
लॉकडाऊन टाळायचा असेल तर..."मी आता सुद्धा गर्दी बघतो आहे. पण ही गर्दी योग्य नाहीय. आपण सर्व काळजी घेत अर्थचक्र सुरू राहावं म्हणून निर्बंध शिथिल केले आहेत. कोणतेही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचेल असं काही करू नका अशी मी विनंती करतो. सर्व राजकीय पक्षांना, धार्मिक आणि सामाजिक संघटनांना माझं आवाहन आहे की नागरिकांचा जीव धोक्यात येईल असं काही करणं टाळलं पाहिजे. कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. आपण जर नियम पाळले नाहीत तर कदाचित तिसरी लाट अपेक्षेपेक्षा लवकर येईल. त्यामुळे लॉकडाऊन टाळायचा असेल तर कुणीही कितीही चिथावण्याचं काम केलं तर चिथावणीला दाद देऊ नका", असं उद्धव ठाकरे म्हणाले.