मुंबई-
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत आहे. ते लवकरच अॅक्शन मोडमध्ये दिसतील, असं विधान राज्याचे पर्यटनमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. तसंच राज्याला मुख्यमंत्री नसल्याचा विरोधकांच्या आरोपांवरही त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं आहे. आरोप-प्रत्यारोप करणं विरोधकांचं काम आहे. जनतेला भरकटवणं हे विरोधकांचं काम आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांना अभिवादन केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. "विरोधकांकडे लक्ष न देणंच योग्य आहे. ते काही ना काही आरोप करत असतात. लोकांची इमेज खराब करत असतात. जनतेला भरकटवत असतात. आपल्या कामावर आपण लक्ष केंद्रीत केलेलं बरं. हल्लीच जे सर्वेक्षण झालं त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टॉप-फाइव्हमध्ये आहेत आणि जनता जनार्दन मुख्यमंत्र्यांसोबत ठाम उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठणठणीत आहेत आणि लवकरच ते अॅक्शन मोडमध्ये दिसतील", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कोरोनाची साथ अजूनही गेलेली नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. रुग्णसंख्या वाढत आहे, असंही ते म्हणाले. तसंच शाळेच्या मुद्द्यावर बोलत असताना पालकांना वाटत असेल तरच त्यांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावं. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही हे पालक आणि शाळेनं ठरवायचं आहे, असं म्हटलं आहे.