Vidhan Parishad Election: उद्धव ठाकरे शेवटच्या क्षणी उमेदवारांचा कोटा ठरवणार; दगाफटका टाळण्यासाठी घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 08:17 AM2022-06-19T08:17:20+5:302022-06-19T08:26:01+5:30
महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे.
मुंबई- विधान परिषदेच्या निवडणूकीत चमत्कार कोणाच्या बाजूने घडेल, हे महाराष्ट्र सोमवारी बघेल. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील, त्यांची विकेट जाईल, असं विधान करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषद निवडणुकीची उत्कंठा आणखीच वाढविली. या बैठकांना जोर आला असून, चारही मोठ्या पक्षांचे आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.
महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कल आहे. राज्यसभेत बसलेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीने सावध पवित्रा घेतला आहे. शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे उमेदवारांचा कोटा ठरवणार असल्याची माहिती समोर येत आहे. दगाफटका होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे कोटा ठरवणार आहेत. तसेच महाविकास आघाडीची एकजूट आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही, असा निर्वाळा अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोणत्याच पक्षाकडे अतिरिक्त मते शिल्लक राहत नाहीत, त्यामुळे पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते आपापल्या उमेदवारांना द्यावी लागतील. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या २६ मतांचे गणित जुळवण्याच्या कामाला सर्व पक्ष लागले आहेत. शिवसेनेसोबतच्या अपक्ष आमदारांची पळवापळवी दोन मित्र पक्षच करीत असल्याचेही चित्र आहे. मविआतील तीन पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक रविवारी होईल, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
क्रॉसव्होटिंग होणार नाही याची दक्षता घेतानाच लहान पक्ष व अपक्षांची मते वळविण्यासाठी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी व काँग्रेसचे नेते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अर्थपूर्ण हालचाली मोठ्या प्रमाणात घडत असल्याची चर्चा आहे. २० जूनला होणाऱ्या निवडणुकीत दहा जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात असून, एका उमेदवाराची विकेट निश्चित आहे. भाजपाचे आमदार ताज प्रेसिडेन्सी, काँग्रेसचे आमदार फोर सीझन, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ट्रायडंट व शिवसेनेचे आमदार वेस्टिन हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.
यांचे पत्ते उघड नाहीत-
तीन आमदार असलेली बहुजन विकास आघाडी व प्रत्येकी २ मते असलेले एमआयएम व समाजवादी या पक्षांनी अद्याप पत्ते उघड केलेले नाहीत. राज्यसभेत एमआयएमने काँग्रेसला, तर सपाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.