CoronaVirus News: मुंबईतील कोरोना लढ्याचे जागतिक पातळीवर कौतुक-  उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 01:00 AM2020-07-21T01:00:14+5:302020-07-21T06:26:35+5:30

दुसरी लाट परतविण्यासाठी सतर्क रहा

CM Uddhav Thackeray's global appreciation for the Corona fight in Mumbai | CoronaVirus News: मुंबईतील कोरोना लढ्याचे जागतिक पातळीवर कौतुक-  उद्धव ठाकरे

CoronaVirus News: मुंबईतील कोरोना लढ्याचे जागतिक पातळीवर कौतुक-  उद्धव ठाकरे

Next

मुंबई : लोकसंख्येची मोठी घनता असलेल्या मुंबईकडे जगाचे लक्ष लागले होते. आपण प्रयत्नपुर्वक या विषाणूचा संसर्ग रोखला आहे. त्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) घेतली आहे. या कौतुकास्पद परिस्थितीत आपली आणखी कसोटी लागणार आहे. त्यामुळे गाफील न राहता कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी प्रशासनाला दिले.

मुंबईतील कोरोना विषाणूचा प्रतिबंध आणि पावसाळी समस्यांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, महापालिकेचे आयुक्त आय. एस चहल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अहोरात्र मेहनतीने काबूत ठेवली आहे. या कामाची दखल डब्लूएचओने घेतली आहे.

आता दुसरी लाट येईल असे जगभरातील निरिक्षण आहे. गाफील राहिल्यावरच दुसरी लाट येते. त्यामुळे सतर्क रहा. रुग्णाला कमीत कमी अंतरावर उपचारासाठी जावे लागेल अशा सुविधा वाढवायच्या आहेत. हळूहळू आपण मुंबई खुली करतो आहोत. कुणाच्याही दबावापेक्षा नागरिकांच्या जिवाशी आपली बांधिलकी आहे. याच पद्धतीने आपण काम करत आहोत. आपल्याला या सर्व गोष्टी काटेकोरपणे करायच्या आहेत. व्हॅक्सीन येईपर्यंत आरोग्य सुविधांच्या दृष्टीने आणखी काही गोष्टी साध्य करण्याचे प्रयत्न आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आगामी सणवार आणि उत्सवाच्या काळात कोरोनाच्या अनूषंगाने दक्षता घेण्याचे आणि त्याबाबत वेळोवेळी नागरिकांपर्यंत मार्गदर्शक सूचना वेळेत पोहचविण्याचे निर्देशही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. यावेळी, महापालिका आयुक्त चहल म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुंबईतील ८३१ प्रतिबंधित क्षेत्र १५३ ने कमी करण्यात यश आले आहे.

सील इमारतींची संख्या कमी करण्यावरही लक्ष केंद्रीत करणार आहोत. धारावीतील बरे झालेल्या काही रुग्णांची पुढच्या पाच दिवसात तपासणी करणार आहोत. त्यातील प्लाझ्मा दान करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अशांकडून शिबीरात प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी हे शिबीर देशात एक वेगळा उपक्रम ठरेल, असे चहल म्हणाले. बैठकीत कोरोना प्रतिबंधाबाबत झोपडपट्टयांच्या क्षेत्रातील परिस्थिती आणि उपाय योजनांची माहिती वॉर्डनिहाय सादर करण्यात आली.

अधिकाऱ्यांची प्रशंसा

अधिकाऱ्यांच्या मेहनतीचे कौतूक करतानाच, जीवावर बेतणारी मेहनत करत आहात. पण हे काम करताना स्वत:ची सुद्धा काळजी घ्या. मास्क आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी घ्या, त्याबाबतही गाफील राहू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईतील नाले सफाई आणि पावसाळ्यातील साथीचे आजार रोखण्याच्या दृष्टीनेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी निर्देश दिले.

Web Title: CM Uddhav Thackeray's global appreciation for the Corona fight in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.