Join us

इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आले. वर्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत पर्यटकांसाठीच्या इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गींचे अनावरण करण्यात आले. वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक हत्तींची पाहणी करून त्याबाबत माहिती घेतली. त्यानंतर बग्गी चालकांना चाव्या वितरित करण्यात आल्या. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. बग्गीचालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजिज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या. मुंबईव्यतिरिक्त राज्यातील पुणे, कोल्हापूर अशा पर्यटनस्थळांवर देखील अशी सुविधा सुरू होणे गरजेचे असल्याचे पर्यटन मंत्री ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक स्थळाजवळ संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या गाडीत असेल.

उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. एकूण ४० व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईत १२ बग्गी सुरू करण्यात येणार आहेत. या १२ बग्गींपैकी ६ बग्गी ‘‘गेट वे ऑफ इंडिया’’ येथील ताज पॅलेस हॉटेल समोरून सुटतील, तर उरलेल्या ६ बग्गी नरिमन पॉईंट येथून सुटणार आहेत. या बग्गींमधून सायंकाळी ४ वाजल्यापासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे २५० बेरोजगारांना यात सामावून घेतले जाणार आहे. ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. एकदा बॅटरी चार्ज झाल्यावर ७० ते ८० किमी पर्यंत प्रवास शक्य होणार आहे. मुंबईनंतर जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव पाळी आदी ठिकाणी या सेवेचा विस्तार, तर मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांवरही लवकरच सेवा सुरू केली जाणार असून मुंबईतील मोठ्या रेस्टॉरंटसोबतही टायअप केला जाणार आहे.