गुड न्यूज! राज्यात CNG, स्वयंपाकाचा गॅस झाला स्वस्त; गॅसचा दर ३.५०, सीएनजी ६ रुपयांनी झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 05:22 AM2022-04-03T05:22:37+5:302022-04-03T05:24:08+5:30
राज्य सरकारने मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) दर कमी केल्याने सीएनजी आणि स्वयंपाकाचा गॅस हे दोन्ही स्वस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - राज्य सरकारने मूल्यवर्धित कराचे (व्हॅट) दर कमी केल्याने सीएनजी आणि स्वयंपाकाचा गॅस हे दोन्ही स्वस्त झाले आहेत. शुक्रवारपासून ही दरकपात लागू करण्यात आली. राज्याचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दर कपातीची घोषणा केली होती. व्हॅटचे दर १३.५ टक्क्यांवरून तीन टक्के इतका करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले होते. त्यानुसार अधिसूचनाही काढण्यात आली होती. ही दर कपात आजपासून लागू झाली.
या निर्णयामुळे पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो सहा रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३.५० रु.नी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.
प्रमुख शहरांमधील सीएनजीचे दर
शहर अगोदरचे आजचे
भाव भाव
औरंगाबाद ८१.९५ ७५.९५
नाशिक ७१.९० ६५.२५
पुणे ६८.५० ६२.२०
पिंपरी चिंचवड ६८.२० ६२.२०
सांगली ८१.७० ७५.००
ठाणे ६६.०० ६०.००
रत्नागिरी ८२.९० ७७.९०