लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंधनाच्या दरवाढीमुळे सामान्य जनता त्रासलेली असतानाच आता कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस म्हणजेच सीएनजीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे २.५८ रुपयांची तर पीएनजीच्या किमतीत ५५ पैशांची वाढ केली आहे. बुधवार १४ जुलैपासून सकाळी हे दर मुंबईत लागू होणार आहेत.
गॅस पाइपलाइन वाहतुकीच्या खर्चामध्ये वाढ झाल्यामुळे परिचालन खर्च आणि अतिरिक्त खर्च देखील वाढला आहे. यामुळेच गॅसच्या दरांमध्ये वाढ केल्याचे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबई व आसपासच्या परिसरात सीएनजी ५१ रुपये ९८ पैसे प्रतिकिलो तर पीएनजी स्लॅब १ मध्ये ३०.४० रुपये व स्लॅब २ मध्ये ३६ रुपये या दराने उपलब्ध होणार आहे.