मुंबई : सहकार विभागाच्या पथकाने मंगळवारी गिरगावात बेकायदेशीररित्या सावकारी करणाऱ्या सावकाराच्या राहत्या घरी धाड टाकली. महावीर चंपकलाल शाह असे या बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून यावेळी त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी व्यवहारासाठी लागणारे कोरे धनादेश, विमा पॉलिसी, राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र आढळून आले.
गिरगावातील मोरवी क्रॉस लेन येथील मलबार व्ह्यू नंबर २ येथील इमारतीत बेकायदेशीररित्या सावकारी व्यवसाय चालत असल्याची तक्रार डी विभागाच्या उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यामुळे डॉ. अविनाश भागवत यांच्या नेतृत्वाखाली सहकार विभागाच्या पथकाने या बेकायदेशीर सावकाराच्या घरी धाड टाकली.
या कारवाईमध्ये अवैध सावकारी संदर्भात अनेक कागदपत्रे हाती लागली असून त्या संदर्भात तपास सुरू असल्याचे भागवत यांनी सांगितले. ही कारवाई मुंबई विभागाचे विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे व जिल्हा उपनिबंधक मुंबई (१) शहर जे. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मुंबई विभागात अवैध सावकारीबद्दल तक्रार असल्यास सहकार विभागाची संपर्क साधण्याचे आवाहन बाजीराव शिंदे यांनी केले आहे.