को-विन साॅफ्टवेअरमुळे लसीकरण प्रक्रिया होणार सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:06 AM2021-01-04T04:06:41+5:302021-01-04T04:06:41+5:30
मुंबई : देशासह राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण प्रक्रियेत को-विन सॉफ्टवेअरचा मोठा वाटा आहे. केंद्र शासनाने तयार केलेल्या या अद्ययावत ...
मुंबई : देशासह राज्यभरात राबविण्यात येणाऱ्या लसीकरण प्रक्रियेत को-विन सॉफ्टवेअरचा मोठा वाटा आहे. केंद्र शासनाने तयार केलेल्या या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे लसीकरणाची प्रक्रिया सुलभ होणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांत या सॉफ्टवेअरच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार असल्याचे निर्देश केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिले आहेत.
लसीचा रिअल टाइम साठा, साठ्यासाठी लागणारे तापमान आणि कोविड लसीकरणाच्या लाभार्थ्यांचा वैयक्तिक मागोवा घेण्यास सुरुवात झाली आहे. हे सॉफ्टवेअर पूर्व-नोंदणीकृत लाभार्थ्यांसाठी स्वयंचलित वाटपाद्वारे सर्व स्तरातील कार्यक्रम व्यवस्थापकांना मदत करेल. लसीकरण वेळापत्रक पूर्ण झाल्यावर त्याचे सत्यापन आणि डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाईल.
देशभरात कोविड १९ लसीचा शेवटच्या घटकापर्यंत योग्यरीत्या पुरवठा करण्यासाठी शीत साखळी सुविधायुक्त तापमान नियंत्रित वातावरण आवश्यक आहे. कोविड लसीकरणासाठी पुरेशा सुया (सिरिंज) आणि इतर साहित्याची निश्चिती केली गेली आहे. सुमारे १,१४,१०० जणांना लसीकरणासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात कार्यस्थळावर लाभार्थ्यांची ओळख, लसीकरण, शीत साखळी आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन, जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन, एईएफआय व्यवस्थापन आणि को-विन सॉफ्टवेअरवर माहिती अपलोड करणे याचा समावेश आहे.