प्रशिक्षक खालिद जमिलचा अभिमान आहे
By admin | Published: May 3, 2017 06:34 AM2017-05-03T06:34:55+5:302017-05-03T06:34:55+5:30
आय-लीग चॅम्पियन एझवाल एफसीचा प्रवास स्वप्नवत आहे. त्यांनी मिळवलेले विजेतेपद ऐतिहासिक असून त्यांना मार्गदर्शन
मुंबई : आय-लीग चॅम्पियन एझवाल एफसीचा प्रवास स्वप्नवत आहे. त्यांनी मिळवलेले विजेतेपद ऐतिहासिक असून त्यांना मार्गदर्शन देणारा मुंबईकर प्रशिक्षक खालिद जमिलचा आम्हाला अभिमान आहे,’ असे मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे (एमडीएफए) अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मंगळवारी एमडीएफएच्या नव्या संकेतस्थळाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. त्याचप्रमाणे, यावेळी त्यांनी मुंबई फुटबॉलच्या प्रगतीसाठी व प्रसारासाठी आखलेल्या काही योजनांची माहितीही दिली. ‘एझवाल एफसीने ज्याप्रकारे जेतेपद पटकावले ते जबरदस्त होते. हे सर्व सांघिक कामगिरी आणि मुंबईकर प्रशिक्षक खालिद यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले. जयेश राणे आणि आशुतोष मेहता या दोन मुंबईकर खेळाडूंनी या पुर्वेकडच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे,’ असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी फुटबॉल प्रगतीसाठी आखलेल्या योजनांबाबत सांगताना मैदान, शालेय उपक्रम, प्रशिक्षण शिबिर याबाबत माहिती दिली. तसेच, ‘या पुढे खेळाडू, प्रशिक्षक व संघटन यासर्वांना मुंबई फुटबॉलच्या घडामोडी संघटनेच्या नव्या संकेतस्थळ व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून देण्यात येईल,’ अशी माहितीही आदित्य ठाकरे यांनी दिली. (क्रीडा प्रतिनिधी)
सेंट झेविअर्स, शहाजी राजे क्रीडा संकुलातील मुंबई स्पोटर््स अरेना आणि वांद्रे येथील नेविल डीसूझा असे तीन फुटबॉल मैदान सध्या मुंबईत उपलब्ध आहेत. तसेच, ठाणे व मुंबई महानगरपालिकेकडे आणखी जाग उपलब्ध करुन देण्याबाबत मी विनंती केली असून येथे फुटबॉल स्टेडियम बांधण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळे संघटनेच्या वतीने आयोजित होणाऱ्या लीग कोणत्याही अडचणींशिवाय पार पाडण्यात मदत होईल.
- आदित्य ठाकरे, अध्यक्ष, एमडीएफए