कोचिंग क्लासला ३६ हजारांचा दंड
By admin | Published: February 21, 2016 01:56 AM2016-02-21T01:56:09+5:302016-02-21T01:56:09+5:30
कोचिंग क्लासने ठरवून दिलेले तास अनियमितपणे घेतल्याने, तसेच दर्जाहीन शिकवणी असल्याने, मुंबई ग्राहक मंचाने ट्रायम्फन्ट इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट एज्युकेशन्स प्रा. लि. ला(टी. आय. एम. इ)
मुंबई : कोचिंग क्लासने ठरवून दिलेले तास अनियमितपणे घेतल्याने, तसेच दर्जाहीन शिकवणी असल्याने, मुंबई ग्राहक मंचाने ट्रायम्फन्ट इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट एज्युकेशन्स प्रा. लि. ला(टी. आय. एम. इ) कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी, एका विद्यार्थ्याला ३६ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा आदेश दिला.
सांताक्रुझच्या सिद्धार्थ छाब्रिया याने एमएच- सीईटी आणि एन. एमएटीसाठी टी. आय. एम. इ. च्या जुहू शाखेत जुलै २०१० मध्ये अॅडमिशन घेतले. वीकेंड बॅचसाठी त्याने १२,५०० रुपये फीदेखील भरली. छाब्रियाच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर २०१० पर्यंत १८ ते २० तास होणे अपेक्षित होते. मात्र, या दरम्यान केवळ आठच तास घेण्यात आले. या संदर्भात छाब्रियाने व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांकडे संपर्क केला. ‘क्लासेस चालवणाऱ्यांची वृत्ती पाहून तक्रारदार त्यांची सेवा घेतल्याबद्दल अत्यंत नाखूश आणि तणावात होता. ते तास नियमित घेत नव्हते. त्याचबरोबर त्यांची शिकवणीही दर्जाहीन होती,’ अशी टिपण्णी ग्राहक मंचाच्या न्यायाधीशांनी केली. अनियमित तास आणि दर्जाहीन शिकवणीबद्दल वारंवार विचारणा करूनही छाब्रियाला पोकळ आश्वासनांशिवाय काहीच ठोस उत्तर मिळत नव्हते. अखेरीस छाब्रिया याने क्लास सोडण्याचा निर्णय घेतला. क्लासने दिलेल्या नोट्स त्याने परत करत, संपूर्ण फी परत करण्यासाठी क्लासला आग्रह धरला. मात्र, टी. आय. एम. इ. ने त्याला केवळ ३,५०० रुपयेच परत केले. छाब्रियाने ते परत घेण्यास नकार दिला. फीची संपूर्ण रक्कम परत मिळावी, यासाठी छाब्रियाने ग्राहक मंचामध्ये तक्रार नोंदवली व न्याय मिळविला. (प्रतिनिधी)