पर्यावरणाच्या रक्षणासाठी सहकुटुंब सायकल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:58 AM2019-03-31T05:58:41+5:302019-03-31T05:59:11+5:30
संडे अँकर । बॅक टू व्हिलेज, बॅक टू नेचर; जीवसृष्टी-मानवजात वाचविण्यासाठी उपक्रम
मुंबई : वाढते शहरीकरण त्यालाच जोडले गेलेले औद्योगिकीकरण, वीज उत्पादन, वाहतूक यामुळे तापमानवाढ अनियंत्रित झाली आहे. या संकटांच्या गंभीर परिणामांची तीव्रता कमी करायची असेल, तर ज्यांना शक्य आहे, त्यांनी शहरे सोडण्याची वेळ आली असून, यासाठी ‘बॅक टू व्हिलेज, बॅक टू नेचर’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, याद्वारे साध्या जीवनशैलीचा मार्ग स्वीकारण्यात येणार असून, सर्वांनाच पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.
‘बॅक टू व्हिलेज, बॅक टू नेचर’ या अंतर्गत जीवसृष्टी व मानवजात वाचविण्यासाठी सहपरिवार सायकल प्रवास केला जाणार आहे, अशी माहिती आशिष दत्तात्रेय मोकल यांनी दिली. ३१ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता उरण येथून हा प्रवास सुरू होईल. या प्रवासात त्यांच्यासोबत पत्नी संचेती, मुलगा व्यास आणि मुलगा सांज यांचा समावेश असून, हा प्रवास अलिबाग येथे संपेल. मोकल यांच्या म्हणण्यानुसार, ‘आम्ही गेली पंधरा वर्षे उरण शहरात पर्यावरणस्नेही जीवनशैली जगण्याचा मार्ग अंगीकारला आणि आता हा मार्ग अजून परिणामकारकतेने जगण्यासाठी उरण हे शहर सोडून अलिबाग येथे जात आहोत. उरण ते अलिबाग हा सागरी मार्गे सायकल प्रवास असणार आहे.’
पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्वीकार
च्शहरांना प्रत्येक गोष्ट पुरवावी लागते. शहरांना जगावे लागते. जगण्यासाठीच्या प्राथमिक गरजाही शहरे निर्माण करू शकत नाहीत. त्या सर्व गरजा आजूबाजूच्या गावांकडून पुरविल्या जातात.
च्शहरांत आधी गरजांसाठी मग सोईसुविधांसाठी ओघ सुरूच राहतो. परिणामी, लोकसंख्येचे विकेंद्रीकरण होते. कालांतराने शहरांचा विस्तार होतो. तेथील काँक्रिटीकरण आजूबाजूच्या जमिनींना, गावांना गिळंकृत करू लागते.
च्शहरातील वाढत्या सुविधा पुरविण्यासाठी शहरीकरण, वाहतूक, औद्योगिकीकरण, वीज उत्पादन, मोटारी वाहतूक यांना आवश्यक रस्ते, इंधन रिफायनरी वाढत जाते. यातून जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल होतो. हे अनियंत्रित होते.
च्परिणामी, सजीव सृष्टीतील घटक म्हणून आम्ही ही पर्यावरणपूरक जीवनशैली स्वेच्छेने, साधेपणाने स्वीकारली आहे, असे आशिष मोकल यांनी सांगितले.
जनजागृतीचा प्रयत्न
सहपरिवार सायकल प्रवास असे या उपक्रमाचे घोषवाक्य आहे. याशिवाय मुलगा सांज याने परत या बालपणाकडे, तर मुलगा व्यासने जीवनशैलीपेक्षा जीवन महत्त्वाचे असा संदेश दिला आहे. पत्नी संचेती यांनी साधेपणा स्वीकारण्याचे तर आशिष मोकल यांनी ‘जीवसृष्टी, मानवजात वाचवा’ असे आवाहन करत पर्यावरणविषयक जनजागृतीचा प्रयत्न करण्यात येत आहे.