बोर्डी : भारतीय तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट एच-१९२ हे गस्ती जहाज मुंबईहून डहाणूतील चिखले समुद्रकिनारी सोमवारी सकाळी ११ वाजता दाखल झाले. याद्वारे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांच्या सागरी सुरक्षेला तसेच मच्छीमारांना मोलाची मदत मिळणार आहे. तटरक्षक दलाचे डहाणूतील स्टेशन कमांडर, कमांडंट राकेश गोंडणे यांनी ही माहिती दिली. २० मीटर लांबीचे हॉवरक्राफ्ट ताशी ९० किमी वेगाने धावते. ते आधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज असून जहाजावर मध्यम पल्ल्याचा मारा करणाऱ्या बंदुका बसविल्या आहेत. १९ ते २३ जानेवारीदरम्यान झाई ते वसई समुद्रात गस्त दिली जाणार आहे. यामध्ये १० कर्मचारी असल्याचे हॉवरक्राफ्टचे कमांडंट संतोष नागर यांनी सांगितले. २० जानेवारीला पालघरचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक मो. हक, डहाणू उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे हे भेट देऊन सागरी सुरक्षेची पाहणी करणार आहेत.तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट पाहण्याकरिता डहाणूतील नागरिक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. कमांडंट राकेश गोंडणे, डेप्युटी कमांडंट विठ्ठल पतंगरे व कर्मचारी, घोलवडचे स. पोलीस निरीक्षक जी. डब्ल्यू बांगर पथकासह हजर होते. (वार्ताहर)तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट डहाणूत दाखल झाल्याने ठाणे व पालघर जिल्ह्यांची सागरी सुरक्षा अभेद्य होणार आहे. मच्छीमारांना समुद्रात आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदत उपलब्ध होईल.- कमांडंट राकेश गोंडणे, तटरक्षक दल, डहाणूतील स्टेशन
तटरक्षक दलाचे हॉवरक्राफ्ट डहाणूत
By admin | Published: January 20, 2015 2:12 AM