Join us

‘कोस्टल’च्या फ्लड गेटमुळे पुराचा धोका टळणार; १४ पैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 10:00 AM

अतिवृष्टी आणि त्याचवेळेस समुद्राला भरती असे समीकरण जुळून आल्यास  समुद्राचे पाणी मुंबईत शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते.

मुंबई : अतिवृष्टी आणि त्याचवेळेस समुद्राला भरती असे समीकरण जुळून आल्यास  समुद्राचे पाणी मुंबईत शिरून पूरपरिस्थिती निर्माण होते. हा दरवर्षीचा अनुभव आहे. मात्र कोस्टल रोडमुळे पूरपरिस्थिती रोखण्यात मोठा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. कोस्टल  रोडच्या पट्ट्यात एकूण १४ फ्लड गेट उभारण्यात येणार असून, त्यापैकी सहा गेट उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सर्व गेट उभारून झाल्यावर पुढील वर्षी या गेटचा प्रभाव दिसून येईल.

मुंबईत तासाला ५० मिमी पाऊस पडला तर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आहे. पूर्वी २५  फक्त मिमी पाऊस पडला  तर  पाण्याचा निचरा होता असे. त्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यास  पाण्याचा निचरा करणारी क्षमता नव्हती. ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत काही कामे हाती घेण्यात आली. त्यानंतर परिस्थितीत काही प्रमाणात  सुधारणा झाली. या प्रकल्पांतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याचे क्षमता  वाढली. त्यामुळे सध्या तासाला ५० मिमी पाऊस पडला तरी पाण्याचा निचरा होऊ शकतो. 

संरक्षक भिंतींचाही आधार :

वरळी  सी-लिंक  ते प्रियदर्शनीदरम्यान ४ किमीची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. या भिंतीमुळे लाटांचे  तडाखे रोखले जातील. एकूणच आगामी काळात फ्लड गेट आणि संरक्षक भिंत यामुळे पावसाळ्यात मुंबईत उद्भवणारी पूरपरिस्थिती आटोक्यात येण्यास हातभार लागेल.

पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था :

 अतिवृष्टी आणि त्याचवेळेस समुद्राला आलेली भरती हे मुंबईत पूरपरिस्थिती निर्माण होण्यामागील एक मुख्य कारण आहे. हे समीकरण जुळून आले की  समुद्राचे पाणी शहरात घुसते. कोस्टल रोडच्या फ्लड गेटमुळे हे पाणी रोखले जाईल. त्यामुळे पूरपरिस्थितीचा धोका टळेल. 

 प्रियदर्शनी ते लव्ह ग्रोव्ह या दरम्यान सहा गेट बांधण्यात  आले आहेत. आणखी सहा गेट लव्हग्रोव्ह ते वरळीदरम्यान उभारले जातील. शिवाय आणखी दोन गेट बांधण्यात येतील. सहा गेट बांधून पूर्ण झाले आहेत. उर्वरित गेटची कामे मे २०२४ पर्यंत पूर्ण होतील. हे गेट स्वयंचलित असतील. त्यामुळे समुद्राचे शहरात येणारे पाणी रोखले जाईल. 

  सर्व गेट उभारून झाल्यावर पुढील वर्षी या गेटचा प्रभाव दिसून येईल. मुंबईत तासाला ५० मिमी पाऊस पडला तर पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था आहे. 

टॅग्स :मुंबई