दक्षिण मुंबई अन् पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टलचा नवा भुयारी मार्ग मेमध्ये सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 09:29 IST2025-04-24T09:29:11+5:302025-04-24T09:29:27+5:30

शिवडी कनेक्टरलाही जोडणी, कोस्टलवरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात हवे तिथे आणि सुरक्षित पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल.

Coastal new subway connecting South Mumbai and Western Suburbs to open in May | दक्षिण मुंबई अन् पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टलचा नवा भुयारी मार्ग मेमध्ये सुरू

दक्षिण मुंबई अन् पश्चिम उपनगराला जोडणारा कोस्टलचा नवा भुयारी मार्ग मेमध्ये सुरू


मुंबई - वरळी आणि प्रभादेवीतून नरिमन पॉइंट तसेच वांद्रे वरळी सी लिंकच्या दिशेने जाणारी वाहतूक सुलभ करण्यासाठी पालिकेकडून मे महिन्याच्या सुरुवातीला एक नवीन भुयारी मार्ग खुला करण्यात येणार आहे.

मरिन ड्राइव्ह आणि प्रियदर्शिनी पार्कदरम्यान समुद्राखालील बोगद्यांव्यतिरिक्त, मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील हा दुसरा भूमिगत मार्ग आहे. या भुयारी मार्गाची लांबी जवळपास ५२० मीटर इतकी असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरांसह हा भुयारी मार्ग शिवडी कनेक्टरला जोडण्यात येणार आहे. यामुळे कोस्टलवरून वाहतूक करणाऱ्या प्रवाशांना कमी वेळात हवे तिथे आणि सुरक्षित पद्धतीने पोहोचण्यास मदत होईल.

शेवटची आंतरमार्गिका
वरळी सीफेसला समांतर असणाऱ्या जे. के. कपूर चौकापासून हा भुयारी मार्ग सुरू होईल आणि बिंदू माधव ठाकरे चौकाजवळ वाहने बाहेर येतील. त्यानंतर कोस्टल रोडच्या दक्षिण आणि उत्तर मार्गिकेवर जाण्यासाठी इथून पर्याय उपलब्ध होऊ शकेल. यामुळे शिवडी-वरळी कनेक्टरवरून प्रवास करणारी वाहने कोस्टल रोडचा वापर करून दक्षिण मुंबई व पश्चिम उपनगरातील इच्छित स्थळी सहज पोहोचू शकतील. यानंतर कोस्टल रोडवरील आणखी एक आणि शेवटची आंतरमार्गिकाही खुला करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. ही आंतरमार्गिका बडोदा पॅलेस ते लोटस जेट्टी अशी असेल. कोस्टल रोडवर एकूण १८ आंतरमार्गिका असून ही शेवटची आहे.

बोगद्यात ओलावा, गळती नाही 
मागील २ दिवसांपासून सोशल मीडियावर कोस्टल रोडवरील बोगद्यात गळती झाल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. मात्र ही बोगद्यातील गळती नसून याआधी करण्यात आलेले पॅचवर्क असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बोगद्याला सर्वांत वरचे आवरण हे फायरबोर्डचे असल्याने येथे गळती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 
बोगद्यातील धूळ आणि दमट वातावरण यांमुळे ओलावा निर्माण झाला आहे आणि या पॅचवर्कवर रंगाचे काम करावे लागेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

कोंडी दूर करण्यासाठी आणखी एक पाऊल
मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने वेगवेगळे रस्ते आणि उड्डाणपुलांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरलेल्या   कोस्टल रोडला आंतरमार्गिकांनी  शहरातील अंतर्गत भागांना जोडण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Web Title: Coastal new subway connecting South Mumbai and Western Suburbs to open in May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.