मुंबई पोलिसांच्या धाडसाच्या अनेक घटना आपण आजवर पाहिल्या आहेत. आज पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आपल्या तत्परतेचं दर्शन घडवत एका महिला पर्यटकाचा जीव वाचवला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे समुद्रात बुडणाऱ्या एका महिला पर्यटकाला मुंबई सागरी पोलिसांच्या एका पथकानं आपला जीव धोक्यात टाकून वाचवलं आहे.
मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. 'गेट वे ऑफ इंडिया'च्या समुद्रातून बोटीनं एलिफंटा आणि मांडवाला प्रवास करतात. अशाच एका बोटीतून प्रवास करत असताना समुद्राच्या लाटेच्या जोरदार धडकेमुळे एक महिला पर्यटक समुद्रात पडली होती. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांचं सागरी सुरक्षा दल सतर्क झालं आणि स्पीड बोटीनं घटनास्थळ गाठलं. मुंबई पोलिसांच्या एका जिगरबाज पोलिसानं महिलेला दोरखंड देत तिचा जीव वाचवला.
महिलेला बोटीत घेण्यासाठी मुंबई पोलीस कर्मचारी आणि सागरी रक्षक यांनी जीवाची बाजी लावली. याचा एक व्हिडिओ देखील एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचं नेटिझन्स कौतुक करत असून मुंबईकर आपल्या पोलीस दलाचा अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया देत आहे.