मुंबई - कोस्टल रोडवर झालेल्या अपघातात गार्गी चाटे (१९) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री झालेल्या या अपघातात एक तरुण जबर जखमी झाला असून, त्याच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मूळची नाशिक येथील असलेली गार्गी चर्चगेटनजीकच्या एका प्रख्यात कॉलेजात शिक्षण घेत होती. शनिवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास ती मित्र संयम साकला याच्याबरोबर प्रभादेवीहून कारने चर्चगेटला जात होती. गाडी कोस्टल रोडवरून जात असताना हाजी अलीजवळ संयमचा कारवरील ताबा सुटला. कार एवढी वेगात होती की ती दोनदा रस्त्यावर उलटली. पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. गार्गीला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
तो मद्यधुंद नव्हता...संयम साकलावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. साकला सीएचे शिक्षण घेत आहे. अपघात झाला, त्यावेळी तो मद्याच्या अमलाखाली नव्हता, असे पोलिसांनी संगितले. ताडदेव पोलिस पुढील तपास करत आहेत.
भरधाव वेगाचा बळीअन्य एका घटनेत भरधाव बाइकच्या धडकेत रशीद शेख (३४) या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास किल्ला कोर्टाच्या एक्झिट गेटसमोर मेट्रो सिनेकडून सीएसएमटीकडे जाणाऱ्या मार्गावर स्पोर्ट्स बाइक चालविणाऱ्या धवल वैद्य या तरुणाने रशीदला जोरदार धडक दिली. त्यात शेखचा मृत्यू झाला. वैद्यविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.