Join us  

कोस्टल रोडचा सल्ला पडू लागलाय महागात; सल्लागार शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:28 AM

गेल्या पाच वर्षांत हे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोस्टल रोडच्या प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेस या पहिल्या टप्प्यासाठीच्या सल्लागाराचे शुल्क विविध कारणांमुळे चौथ्यांदा वाढले आहे. गेल्या पाच वर्षांत हे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे.

कोस्टल रोडच्या कामाचा कालावधी वाढल्यामुळे सल्लागारांच्या शुल्कातही सतत वाढ होत आहे. कोरोना काळ, न्यायालयीन खटले तसेच तंत्रज्ञानातील बदल आदी कारणांमुळे कामाचा कालावधी आणि त्याचबरोबर सल्लागाराच्या शुल्कातही वाढ झाली आहे.

प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सी-लिंक टोकापर्यंत कोस्टल रोडचे काम तीन टप्प्यांत सुरू आहे. प्रकल्प ९१ टक्के पूर्ण झाला आहे. डिसेंबर २०१८ पासून या प्रकल्पास सुरुवात झाली होती. २०२२ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाणे अपेक्षित होते. मात्र विविध कारणांस्तव प्रकल्पाचा कालावधी वाढला. अजूनही प्रकल्पाचे नऊ टक्के काम शिल्लक आहे. पहिल्या टप्प्यातील सल्लागाराचे शुल्क गेल्या पाच वर्षांत चार वेळा वाढवण्यात आले आहे.

प्रकल्प एकूण तीन भागांत केला जात आहे. या तिन्ही भागांसाठी तीन सल्लागार नेमण्यात आले आहेत. या सल्लागारांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी आणखी एका स्वतंत्र सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यासाठी २०१८ साली सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली होती. त्याचे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे.

कामात बदल झाला, पैसे वाढवा  

कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत ३४ मीटर रुंदीचे आणि दोन हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. एकूण १५.६६ किलोमीटर लांबीचे आंतरबदलही बांधण्यात येणार आहेत. कामात बदल झाल्याने सल्लागारांनी वाढीव शुल्काची मागणी केली होती. साधारण सल्लागाराने पाच कोटी ९१ लाखांची शुल्कवाढ मागितली होती. नंतर पहिल्या टप्प्यातील सल्लागाराने ८ कोटी ९२ लाख रुपयांची शुल्कवाढ मागितली. प्रकल्पातील पार्किंगची कामे अजून शिल्लक आहेत. त्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. या कामासाठी पाच कोटी २६ लाखांचे शुल्क वाढवण्यात आले आहे. 

टॅग्स :मुंबईराज्य सरकार