Join us

कोस्टल रोडच्या पुलाचा भार १७६ खांबांवर; देशात पहिल्यांदाच एकल स्तंभावर पूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 5:37 AM

कोस्टल रोडअंतर्गत ३४ मीटर रुंदीचे व २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येतील, तर १५.६६ कि.मी. लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) बांधण्यात येणार आहेत.

मुंबई : कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची डेडलाइन पाळण्यासाठी कोरोना काळातही हे काम जोमाने सुरू आहे. आता या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येतील. या पद्धतीने तीन चाचणी स्तंभांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या पुलांचा भार एकखांबी वाहिला जाईल.

कोस्टल रोडअंतर्गत ३४ मीटर रुंदीचे व २,१०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येतील, तर १५.६६ कि.मी. लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) बांधण्यात येणार आहेत. समुद्र, नदी, तलाव आदीवरील पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणाऱ्या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे चार स्तंभ उभारण्यात येतात. मात्र, एकल स्तंभ पद्धतीमध्ये खालपासून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या पुलांखाली १७६ स्तंभ उभारण्यात येतील.

बांधकामाच्या वेळेसह खर्चात बचत

परंपरागत बहुस्तंभीय पद्धतीचा वापर करुन या १७६ खांबांची उभारणी करण्यासाठी प्रत्येक खांबाकरिता चार आधारस्तंभ यानुसार एकूण ७०४ स्तंभांची उभारणी समुद्रतळाशी करावी लागली असती. यासाठी समुद्रतळाच्या अधिक जागेचा वापर होण्यासह खर्च व वेळ अधिक लागला असता.  मात्र, एकल स्तंभ तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारे खांब हे तळापासून वरपर्यंत एकच खांब असणार आहेत. त्यामुळे ७०४ स्तंभांऐवजी १७६ स्तभांची उभारणी केली जाणार असल्याने समुद्रतळाचा कमीत कमी वापर होणार आहे. परिणामी, बांधकामाच्या वेळेत व खर्चात बचत होऊ शकेल.

टॅग्स :रस्ते वाहतूकमुंबई