कोस्टल रोडमुळे ४० मिनिटांचे अंतर आता १४ मिनिटांत पूर्ण होईल!
By जयंत होवाळ | Published: January 15, 2024 10:00 AM2024-01-15T10:00:08+5:302024-01-15T10:00:56+5:30
‘मेट्रो ३’ची जबाबदारी असलेल्या मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे कोस्टल रोडचीही धुरा सोपवली आहे. त्यांनी ‘लोकमत’चे विशेष प्रतिनिधी जयंत होवाळ यांच्याशी केलेली बातचीत.
मेट्रो ३ प्रकल्पाची सद्य:स्थिती काय?
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो -३ मार्गाचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गातील आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा नजीकच्या काळात सुरू होईल. या टप्प्याचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गासाठी १२ ट्रेनची आवश्यकता आहे. सध्या ९ ट्रेन ताफ्यात दाखल झाल्या आहेत. उर्वरित ट्रेन पुढील पाच ते सहा महिन्यांत मुंबईत दाखल होतील. एप्रिल किंवा मे २०२४ मध्ये पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल.
कार डेपो उभारणीस झालेल्या विलंबाचा प्रकल्पावर किती परिणाम झाला?
निश्चितच झाला. आधी या मार्गाचा कार डेपो आरे कॉलनीत उभारला जाणार होता; पण त्या जागेवरून वाद निर्माण झाला. त्यांनतर कांजूरमार्ग येथे डेपो बांधण्याचा निर्णय झाला. त्यानंतर पुन्हा आरे कॉलनीचीच जागा निश्चित झाली. या सगळ्या वादात दोन- अडीच वर्षे गेली. त्यामुळे डेपोचे काम रखडले. आता सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत.
तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात लावलेली काही झाडे जगली नाहीत, असा आक्षेप आहे.
तोडलेल्या झाडांच्या मोबदल्यात एकूण २५ हजार झाडे लावण्यात आली आहेत. काही झाडे जगली नाहीत, असे घडू शकते; परंतु त्याचीही भरपाई आम्ही करत आहोत. दोन हजार झाडे आम्ही नर्सरीत वाढवली आहेत. ती झाडे मेट्रो स्थानकाच्या वर लावली जातील.
कोस्टल रोड आणि मेट्रो प्रकल्प राबवताना किती आव्हाने होती?
मेट्रो ३ हा प्रकल्प विशेष करून सर्व दृष्टीने आव्हानात्मक होता. मुंबईच्या दाटीवाटीच्या भागातून हा मार्ग जातो. या मार्गात अनेक जुन्या इमारती, हेरिटेज वास्तू आहेत. बोगदा खोदताना या इमारतींना कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागली. काळबादेवी आणि गिरगावातील प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन, त्यासाठी त्यांना राजी करणे, पुनर्वसनासाठी विशेष पॅकेज तयार करणे या मोठ्या गोष्टी होत्या. त्याशिवाय प्रकल्पासाठी विविध यंत्रणांच्या परवानग्या, न्यायालयीन खटले याही बाबी होत्या; परंतु सर्व अडचणी, वाद, आव्हाने यावर मात करून प्रकल्प अंतिम टप्प्यात आणून ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आव्हाने खूप होती; परंतु प्रकल्प पूर्तीचा आनंद मोठा असेल.
कोस्टल रोड प्रकल्पाची सद्य:स्थिती काय आहे?
दक्षिण दिशेकडील वरळी ते मरिन ड्राइव्ह हा पहिला टप्पा १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू करण्याचा मानस आहे. संपूर्ण कोस्टल रोड मे २०२५ पर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. १०.५८ किमीचा कोस्टल रोड मरिन ड्राइव्ह ते वरळी सी लिंकला जोडला जाईल. सध्या हे अंतर कापण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागतो. कोस्टल रोडमुळे हे अंतर किमान १२ ते १४ मिनिटांत कापता येईल. वाहतुकीचा वेळ सुमारे ७०% वेळ कमी होईल. ३४ टक्के इंधनाची बचत होईल. सुमारे ७० हेक्टर खुले आणि हिरवे क्षेत्र तयार होईल.