लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबईतील महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडची वरळी ते मरिन ड्राइव्हची एक मार्गिका खुली झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी सकाळी ८ ते रात्री ८ या १२ तासांत १६ हजार ३३१ अधिक वाहनांनी प्रवास केला. वरळी ते मरिन ड्राइव्हपर्यंतचा पल्ला अवघ्या १० मिनिटांत पार करता येत असल्याने प्रवास करणाऱ्या अनेकांनी समाधान व्यक्त केले.
सागरी किनारी मार्गावरून सफर करताना संपूर्ण कोस्टल रोड लवकरात लवकर पूर्ण होऊन मुंबईकरांसाठी खुला व्हावा, अशी अपेक्षाही अनेकांकडून व्यक्त करण्यात आली. किनारा मार्ग प्रकल्पाचे एकूण ८६ टक्के काम पूर्ण झाले असून, मे २०२४ पर्यंत उर्वरित काम पूर्ण होणार आहे.
वरळी येथून कोस्टल रोडवर जाताना बिंदू माधव चौकात सिग्नल बंद करावा लागत असल्याने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची लांबच लांब रांग लागत आहे. यामुळे या चौकात वाहतूककोंडी होत असल्याचा परिणाम दिसून आल्याने कोस्टल रोडच्या वेळेत आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी येथे कोस्टल रोडची मार्गिका सकाळी ८ ते रात्री ८ अशी खुली राहणार होती. मात्र, आता ती सायंकाळी ५ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोस्टल रोडचे उर्वरित काम अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुदतीत पूर्ण करता येऊ शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञान
कोस्टल रोडवर सुरक्षा आणि वाहतूक नियमनासाठी शंभरपेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. बोगद्यात अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही केल्या असून, बोगद्यांमध्ये वायूविजन प्रणाली आहे. १०० मेगावॉट तीव्रतेच्या आगीत किमान तीन तास तग धरू शकेल, अशा पद्धतीने या बांधकामाची संपूर्ण रचना आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चार शीघ्र प्रतिसाद वाहने, तर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तैनात आहेत.