कोस्टल रोड प्रकल्पाला स्थानिक मच्छीमारांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:06 AM2018-12-16T06:06:13+5:302018-12-16T06:06:36+5:30
उद्घाटनप्रसंगी विरोध करणार : मासेमारीवर होणार परिणाम
मुंबई : भाजपाच्या धास्तीने महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचे भूमिपूजन शिवसेना रविवारी उरकून घेणार आहे. या प्रकल्पाला असलेला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध अद्याप मावळलेला नाही. या प्रकल्पाचा मासेमारीवर परिणाम होणार असल्याने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कोस्टल रोडच्या कार्यक्रमात कोळी बांधव वरळी येथे या प्रकल्पाला तीव्र विरोध करणार आहेत.
मुंबईतील वाहतूककोंडीवर उतारा म्हणून नरिमन पॉइंट ते मालाड मार्वे असा कोस्टल रोड तयार होणार आहे. या कोस्टल रोडमधील प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंतचे काम महापालिका करणार आहे. त्यानुसार पालिकेने कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात केली आहे. प्रियदर्शनी येथे समुद्रात भराव टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याच खडकाळ भागात भराव टाकत ही जागा पूर्णपणे बंद केली जात आहे. त्यामुळे मासे नष्ट होणार असून आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याची नाराजी स्थानिक कोळी बांधव व्यक्त करीत आहेत.
या कामासाठी समुद्रात अनेक ठिकाणी खांब उभे करण्यात आल्याने मच्छीमारांच्या बोटी जाण्यासही अडथळा निर्माण झाला आहे. या प्रकरणी वरळीतील मच्छीमारांनी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांची भेट घेऊन कोस्टल रोडच्या मार्गात बदल करण्याची मागणी केली होती. पालिकेकडून दिलासा न मिळाल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी आहे. त्याचे पडसाद उद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसणार असल्याचे समजते.
शिवसेनेला ‘मनसे’ लगाम
च्शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडला विरोध करणाऱ्या मच्छीमारांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला आहे. कोळी बांधवांची तक्रार ऐकण्यासाठी राज ठाकरे रविवारी, १६ डिसेंबरला सकाळी ९ वाजता वरळी कोळीवाड्याला भेट देणार आहेत. त्यामुळे कोस्टल रोड प्रकल्पावरून शिवसेना विरुद्ध मनसे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.