लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: बहुप्रतीक्षित असलेल्या कोस्टल रोडचा काही भाग जानेवारीअखेरीस मुंबईकरांच्या सेवेत सादर होण्याची शक्यता आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे ८४ टक्के काम झाले असून, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. कोस्टल रोड टोलमुक्त असेल, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करतानाच वेळ आणि इंधनाची बचत करणारा हा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.
कोस्टल रोड प्रकल्पात भारतात प्रथमच अतिशय अद्ययावत ‘सकर्डो व्हेंटिलेशन’ ही वायुविजन प्रणाली बोगद्यात बसविण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात धूर न साठता तो बाहेर फेकण्याचे काम या प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे, तसेच यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महापालिका नियंत्रण कक्ष, पोलिस, वाहतूक पोलिस, अग्निशमन दलाला तत्काळ संदेश जाऊन मदत घेता येणार आहे. प्रकल्पातील दक्षिण दिशेला जाणाऱ्या भूमिगत बोगद्याची पाहणी केली.
दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बोगद्याची कामे अंतिम टप्प्यात असून, ती सर्व दिनांक ३१ जानेवारी २०२४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे, तर उत्तर दिशेने जाणाऱ्या बोगद्याची कामे मे २०२४ अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा बोगदा वाहतुकीसाठी खुला केल्याने वाहतुकीला जलद प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.