Join us  

कोस्टल रोड होणार देखणा; सागरी किनारा मार्ग नजरेच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 6:01 AM

सायकल, जॉगिंग ट्रॅक, वाहनतळाची सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दक्षिण मुंबईतून पश्चिम उपनगरांमध्ये झटपट पोहोचता यावे या उद्देशाने उभारण्यात येत असलेल्या मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पात उपलब्ध होणाऱ्या भूभागावर नागरी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये जॉगिंग, सायकल ट्रॅक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाटय़गृह, लहान मुलांसाठी उद्याने व खेळाची मैदाने, प्रसाधनगृहे, पोलिस चौकी, बसथांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ आदींचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधांसोबत महत्त्वाचे म्हणजे एक हजारांहून अधिक क्षमतेचे तीन भूमिगत वाहनतळे उभारण्याचाही पालिकेचा मानस आहे. दरम्यान, यासाठी पालिकेने नगर रचनाकार आणि तज्ज्ञांकडून सूचना मागविल्या आहेत.

किनारा रस्ता प्रकल्प हे एकप्रकारे मुंबईचे स्वप्न असून फक्त रस्ता बांधून न थांबता त्याभोवती रमणीय व प्रेक्षणीय जागा विकसित केल्या जाणार आहेत. त्यामुळे  सागरी किनारा रस्त्याच्या निमित्ताने उपलब्ध होणाऱ्या भराव क्षेत्रातही पालिकेतर्फे उद्याने व मैदाने विकसित करण्यात येणार आहेत. यात लहान मुलांसाठी खेळसाधनांचा समावेश आहे. किनारा मार्गाजवळ १४ ठिकाणी बसथांबे असतील. ‘लॅण्डस्केपिंग’ प्रत्यक्ष स्वरूपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने पालिकेने तज्ज्ञांची मदत घेण्याचे ठरविले आहे.

सागरी किनारा मार्ग नजरेच्या टप्प्यात

  सागरी किनारा मार्गासाठी ११९ लाख ४७ हजार ९४० चौरस फुटांचे (१११ हेक्टर) भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे  २८ लाख ५२ हजार ४४० चौरस फुटांच्या परिसरावर (२६.५० हेक्टर) सागरी किनारा आंतरबदलासह रस्त्याचे बांधकाम होणार आहे  १५,६०,७७० चौरस फूट (१४.५० हेक्टर) क्षेत्र हे समुद्री लाटांपासून संरक्षणासाठी भिंतीच्या बांधकामासाठी वापरले जाईल.  ७५ लाख ३४ हजार ७३० चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत.