मुंबई : वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबईत प्रदूषण वाढत आहे. मात्र, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते कांदिवलीपर्यंत ९.९८ कि.मी. तयार होणारा कोस्टल रोड यास अपवाद राहणार आहे. या मार्गावरील दोन बोगद्यांच्या मुखांजवळ ‘सकार्डाे नोझल’ ही अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यासोबतच वाहनांमधून सोडला जाणार धूरदेखील बोगद्यातून लगेच बाहेर पडून बोगद्यातील वातावरण चांगले राहणार आहे. तसेच एखाद्या गाडीला आग लागल्यास त्यातून उत्पन्न होणारा धूरदेखील या यंत्रणेद्वारे अत्यंत वेगाने बाहेर खेचला जाणार आहे. अशा प्रकारची यंत्रणा देशात प्रथमच या प्रकल्पात वापरली जाणार आहे.
कोस्टल रोड हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे. या मार्गावर गिरगाव चौपाटी व मलबार हिलखालून प्रत्येकी ३.४५ किलोमीटर लांबीचे दोन बोगदे असणार आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील हवा खेळती राहावी, यासाठी सकार्डाे नोझल ही अत्याधुनिक यंत्रणा बोगद्यांच्या मुखांजवळ बसविली जाणार आहे. त्यामुळे गाड्यांचा धूर बाहेर खेचला जाईल व आपत्कालीन परिस्थितीचे नियोजन करणेही सुलभ होणार आहे. त्याचबरोबर एलईडी दिवे, छेद बोगदे व आपत्कालीन संपर्क मार्ग असणाऱ्या या बोगद्यांमधील रस्तेदेखील आंतरराष्ट्रीय मानकांनुसारच तयार केले जाणार आहेत, असे या प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मोहन माचिवाल यांनी सांगितले.
समुद्रालगतच असल्याने भूगर्भातील व वेगवेगळ्या ऋतुंमधील वातावरणातील बदलांचा विचार करून बोगद्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. टनेल बोअरिंग मशीनद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे बांधण्यात येणारे हे बोगदे भूकंपरोधक असणार आहेत. तसेच एखाद्या वाहनाला आग लागण्याची घटना घडल्यास तेवढे तापमान बोगदा व त्यातील भिंती सहन करू शकतील. बोगद्यांमध्ये दोन्ही बाजूला वाहनांच्या सुरक्षेसाठी क्रॅश बॅरियर असतील.या बोगद्यांचे आयुर्मान हे १२० वर्षांचे असणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत एका बोगद्यातून दुसºया बोगद्यात सहजपणे जाता यावे, यासाठी दोन्ही बोगद्यांना १३ छेद-बोगदे असणार आहेत.यामुळेच कोस्टल रोड प्रदूषणमुक्तगिरगाव चौपाटी व मलबार हिलच्या खालून प्रियदर्शनी पार्कपर्यंत जाणारे हे ३.४५ किमी अंतराचे हे दोन बोगदे शेजारी-शेजारी असणार आहेत. यातील सकार्डाे नोझल यंत्रणेमुळे बोगद्याची वाहतूक ज्या दिशेने जात असेल, त्याच दिशेने ही हवा आत ढकलली जाते व दुसºया बाजूने बाहेर खेचली जाते. ज्यामुळे बोगद्यातील हवा खेळती राहण्यासोबतच वाहनांमधून सोडला जाणारा धूरदेखील बोगद्यातून लगेच बाहेर पडतो व प्रदूषण उत्सर्जित होऊन बोगद्यातील वातावरण चांगले राहण्यास मदत होते.स्वयंचलित अग्निशमन यंत्रणाआगीची संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बोगद्यांमध्ये स्वयंचलित अग्निशमन यंत्रणा कार्यरत राहणार आहे. यामध्ये बोगद्याच्या अंतर्गत छताला जागोजागी स्प्रिंकलर्स बसविले जाणार आहेत. याचबरोबर फायर एक्स्टींग्विशर, फायर हायड्रंट, फायर होज रील, फीक्स फायर सिस्टम इत्यादी बाबीदेखील बोगद्यांमध्ये असणार आहेत. मुबलक प्रमाणात व उच्च दाबाने पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी बोगद्यांमधील अग्निशमन यंत्रणेला जोडलेली व नियमितपणे कार्यरत राहणारी स्वतंत्र जलवाहिनीदेखील असणार आहे.