मुंबई : कोविडकाळात अन्य विकासकामांना खीळ बसली, तरी महत्त्वाकांक्षी मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम सुसाट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे. यापैकी भरावाचे काम ९० टक्के, सागरी भिंतीचे ६८ टक्के आणि दुहेरी बोगद्यांचे ११ टक्के काम पूर्ण झाले आहे.
प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंकपर्यंतचा १०.५८ कि.मी.चा कोस्टल रोड मुंबई महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येत आहे. या मार्गात चार अधिक चार लेनसह भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे आहेत. हे बोगदे खोदण्यासाठी चीनमधून २३०० टन वजनाचे महाकाय टनेल बोअरिंग मशीन गेल्या वर्षी मुंबईत आणण्यात आले. मलबार हिलच्या खालून हे बोगदे जाणार आहेत.
या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोअरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू आहे. त्यानुसार जमिनीच्या खाली १० ते ७० मीटर हे बोगदे असणार आहेत. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ कि.मी. असेल. या दुहेरी बोगद्यांचे ११ टक्के काम आता पूर्ण झाले आहे; तर भराव टाकण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले, असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
जुलै २०२३ पर्यंतची डेडलाईन...
मुंबईकरांची वेळ, इंधन आणि पैशांची बचत करणारा कोस्टल रोड २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र न्यायालयीन स्थगिती आणि कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कोस्टल रोडचे काम लांबणीवर पडले होते. त्यामुळे कामाची नवीन डेडलाइन जुलै २०२३ आहे. या प्रकल्पाचा खर्चही आता १२,७२१ कोटींवर पोहोचला आहे.
देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ तंत्रज्ञानाचा वापर
कोस्टल रोडमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. तसेच वेळेची ७० टक्के आणि इंधनाची ३४ टक्के बचत होणार आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषणाचे प्रमाणही कमी होईल, असे दावा पालिका प्रशासन करीत आहे. या प्रकल्पांतर्गत देशात प्रथमच ‘एकल स्तंभ’ (मोनो पाईल टेक्नॉलाजी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे कोस्टल रोडचा भाग असणाऱ्या पुलांखाली १७६ खांब उभारण्यात येणार आहेत.
फोटो ओळ : कोरोनाकाळात अन्य विकासकामांना खीळ बसली, तरी महत्त्वाकांक्षी मुंबई सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पाचे काम सुसाट सुरू आहे. आतापर्यंत या प्रकल्पाचे ३६ टक्के काम पूर्ण झाले आहे.
फोटो ओळ : प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग असणाऱ्या महाबोगद्याचे खोदकाम ११ जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात आले. टनेल बोअरिंग मशीन या संयंत्राद्वारे हे काम सुरू आहे. प्रत्येक बोगद्याची लांबी २.०७ कि.मी. असेल. ( छाया : दत्ता खेडेकर )