Join us  

‘कोस्टल’च्या दुसऱ्या बोगद्याचे काम ४ दिवसांत; पालिका अधिकाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 12:08 PM

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत कोस्टल रोड बांधण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर व विनासायास व्हावा यासाठी कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या मार्गातील  प्रियदर्शिनी पार्क ते चौपाटी दरम्यान २.०७० किलोमीटर अंतराचे दोन बोगदे बांधण्यात येणार असून यापैकी एका बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बोगद्याचे खोदकाम येत्या चार दिवसात पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी वांद्रे सी लिंकपर्यंत कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. प्रकल्पाचे काम नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार असून त्या दृष्टीने कामे सध्या सुरू आहेत. कोस्टल रोड मार्गावर २.०७० किमीचे दोन बोगदे असून ३ ठिकाणी इंटरनेचेंज आहे तर १११ हेक्टर जागेवर रिकलेमेशन करण्यात आले आहे. या मार्गामुळे ३४ टक्के इंधनाची बचत होणार असून कोस्टल रोडवर मोकळ्या हिरव्या जागा, बटरफ्लाय गार्डन तसेच १ हजार ८५६ गाड्या पार्क करण्याची क्षमता असलेले ४ पार्किंग लॉट उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम सुमारे ७५ टक्के पर्यंत झाले असून या मार्गातंर्गत असलेल्या बोगदे खोदण्याचे काम सुरू आहे. 

मरिन ड्राइव्हकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी वापरात येणाऱ्या पहिल्या बोगद्याचे खोदकाम मावळा टनेल मशीनद्वारे यापूर्वीच पूर्ण झाले असून दुसऱ्या बोगद्याचे २३ मीटर खोदकाम अद्याप बाकी आहे. गेल्या आठवड्यात हे काम पूर्ण होणार होते, मात्र कठीण खडकामुळे या कामास वेळ लागला.  दिवसाला ५ मीटर खोदकाम याप्रमाणे पुढील चार दिवसांत खोदकाम पूर्ण होईल.

‘किनारी मार्गाची भ्रमणगाथा’ प्रदर्शन २८ मे पर्यंतपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडचे काम कशा प्रकारे सुरू आहे, हा प्रकल्प कसा आकार घेतोय याची मुंबईकरांना उत्सुकता असून छायाचित्रांद्वारे हा प्रकल्प पाहता येत आहे. पालिकेने यासाठी ‘किनारीमार्गाची भ्रमणगाथा’ हे छायाचित्र प्रदर्शन नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) च्या सहकार्याने, नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’मधील दिलीप पिरामल आर्ट्स गॅलरीमध्ये भरवले आहे. प्रदर्शनाला मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने हे प्रदर्शन २८ मे पर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे.