सिद्धिविनायक मंदिरात आजपासून गाभारा दर्शन बंद; 'या' तारखेला भाविकांसाठी होणार खुलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:17 PM2024-12-11T14:17:12+5:302024-12-11T14:49:56+5:30
Siddhivinayak Ganapati Temple : मुंबईचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी येथील प्रसिद्ध ...
Siddhivinayak Ganapati Temple :मुंबईचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. प्रभादेवी येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर पुढील आठवड्यात पाच दिवस दर्शनासाठी बंद राहणार आहे. सिद्धिविनायक गणपती दर्शनासाठी रोज लाखो भाविक लांबून येतात. मात्र ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर असे पाच दिवस सिद्धिविनायक मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली आहे.
बुधवार ११ डिसेंबर ते रविवार ५ डिसेंबर या कालावधीत श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपण करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. त्यामुळे या काळात भाविकांना प्रत्यक्ष श्रींच्या मूर्तींचे दर्शन घेता येणार नाही, तर त्यांना श्रींच्या प्रतिमेचे दर्शन घेता येईल.
त्यानंतर सोमवारी १६ डिसेंबर रोजी श्री सिद्धिविनायकाची महापूजा झाल्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन घेता येणार आहे.
"मंदिरात दरवर्षीप्रमाणे माघ श्रीगणेश यंतीपूर्वी श्रींचे सिंदूर लेपन केले जाते. त्याप्रमाणे या वर्षी बुधवारी ११ डिसेंबर २०२४ ते रविवार, १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत श्रींचे सिंदूर लेपन करण्याचे ठरविलेले आहे. सिंदूर लेपनाच्या कालावधीत भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. भाविकांना गाभाऱ्या बाहेरून श्रींच्या प्रतिमूर्तीचे दर्शन दिले जाईल. या कालावधीत मंदिरातील सर्व नित्य धार्मिक कार्यक्रम नेहमीच्या वेळेवर होतील. सोमवार १६ डिसेंबर २०२४ या दिवशी गाभाऱ्यामध्ये स्थलशुद्धी प्रीत्यर्थ उदकशांत व प्रोक्षण विधी हा धार्मिक विधी होईल नंतर श्रींची महापूजा, नैवद्य व आरती झाल्यानंतर दुपारी १ पासून भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन दिले जाईल. तसेच श्रीमारुतीचे देखील प्रतिवर्षाप्रमाणे सिंदूर लेपन करण्यात येते त्यामुळे या कालावधीत श्रीमारुतीचे दर्शन बंद राहील," असं श्रीसिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे सांगण्यात आलं आहे.