शीतपेय बनवणाऱ्या कोका-कोला कंपनीची भारतीय बाजारात मोठी उलाढाल आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच कोका कोलाने माझा ड्रींक्सला पुढील २ वर्षात १ अब्ज डॉलरचा ब्रँड बनवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. कंपनीसाठी भारत हा जगातील ५ व्या क्रमांकाचं सर्वात मोठं मार्केट आहे. त्यामुळे, भारतात आणखी गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. त्यातच, कोका-कोला कंपनीचे भारतातील प्रमुख संकेत राय यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस यांनी संकेत राय यांच्यासमेवतचा फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. तसेच, कोका-कोला कंपनीचे प्रमुख संकेत राय यांनी मुंबईतील घरी भेट दिली. त्यावेळी, भारतात भविष्यकाळात होणाऱ्या गुंतवणुकीची माहिती दिली. तसेच, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील टॅलेंटला व्यासपीठ मिळवून देण्याचं कामही कंपनीकडून होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यासाठी, कोक-स्टुडिओ भारत हे नवं व्यासपीठ सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील गायकांना यातून प्रमोट करण्याचा कंपनीचा विचार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी ट्विटरवरुन दिली.
दरम्यान, भारतातील कोका-कोला कंपनीच्या उलाढालीची माहिती दिली. तसेच, भविष्यातील गुंतवणुकीसाठी काही प्रस्तावही दिले आहेत. भारतातील विस्तार योजनेचा आढावा घेऊन मला आनंद झाला, असेही फडणवीस यांनी या भेटीनंतर म्हटले आहे.