मुंबईवर कोकेनचाच ‘अंमल’; १० महिन्यांत केंद्रीय तपास यंत्रणांनी जप्त केले ५९५ कोटींचे ड्रग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 07:04 AM2023-11-01T07:04:16+5:302023-11-01T07:04:27+5:30
हॉस्टेलमधील एकलकोंडेपणाला नशेचा आधार
मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत अमली पदार्थांचे साठे व कारखाने मोठ्या प्रमाणावर सापडत आहे. पोलिसांच्या कारवाया सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी एकट्या मुंबई व अन्य परिसरातून सरत्या १० महिन्यांत तब्बल ५९५ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक कोकेनचा वाटा असल्याचे दिसून आले.
परदेशातून मुंबईत अमली पदार्थांची तस्करी करू पाहणाऱ्या तस्करांना यावर्षी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी जोरदार दणका दिला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत झालेल्या किमान १४ तस्करींच्या प्रकरणात अधिकाऱ्यांनी तब्बल ३९८ कोटी रुपयांचा माल जप्त केला आहे. या कालावधीत आतापर्यंत तब्बल २५ किलोंपेक्षा अधिक कोकेन जप्त करण्यात आले, तर अन्य प्रकरणांत एकूण २६ पेक्षा जास्त तस्करांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.
अमली पदार्थांविरोधात नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने देखील कंबर कसली असून सरत्या १० महिन्यात या विभागाने ५० किलोंपेक्षा जास्त वजनाचे विविध अमली पदार्थ जप्त केले आहेत. या सर्वाची आंतरराष्ट्रीय बाजारातील एकूण किंमत १९७ कोटी ५६ लाख रुपये इतकी आहे.
पाच हजार ते १ लाखांसाठी तस्करी
प्रत्यक्ष तस्करी करणाऱ्या ज्या लोकांना अधिकाऱ्यांनी अटक केली आहे ती केवळ प्यादी असल्याचे तपासात दिसून आले. या तस्करीकरिता या हँडलरना पाच हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.
विविध प्रकरणात झालेल्या या कारवाईत ४१ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये परदेशी नागरिकांचा समावेश देखील लक्षणीय आहे. एनसीबीने केलेल्या कारवायांचे वैशिष्ट्य म्हणजे, केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईतील तस्करांशी संधान साधत राज्याच्या इतर भागात होत असलेल्या तस्करीचा देखील अधिकाऱ्यांनी माग काढला.
केवळ एक कारवाई केली आणि थांबले असे न करता त्याच्या मुळापर्यंत जात ते रॅकेट उद्ध्वस्त करण्याकडे एनसीबीचा कल दिसून आला. मुंबई, मुंब्रा, ठाणे, भिवंडी, पुणे तसेच आंतरराज्यीय पातळीवर गुजरात, मध्य प्रदेश, गोवा अशा राज्यांत जाऊन अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.
काय करावे...
तरुणाईने ड्रग्जच्या आहारी जाऊ नये. तसेच पालकांनी आपला पाल्य काय करतो यावर लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा एकटा राहतोय का? इंटरनेटवर त्याचा वावर वाढलाय का? त्याचे मित्रमंडळी बदलले आहेत का?, खर्च वाढला आहे का? तो डार्कवेबवर जास्त सर्चिंग करतोय का? तसेच काही चुकीचे आढळून आल्यास तात्काळ मदत घेण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हॉस्टेलमधील एकलकोंडेपणाला नशेचा आधार...
नशेच्या दुनियेत सध्या हॉस्टेलमधील तरुणाईला ओढण्याचा प्रयत्न वाढत आहे. मुंबईत अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था, नामांकित महाविद्यालये, आयआयटी- मुंबईसारखी मोठी संकुले (कॅम्पस) आहेत.
धावत्या मुंबईकरांच्या जीवनशैलीत बराच बदल झाला आहे. आधुनिकतेचे वारे वाहत आहेत. पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभावही वाढत आहे. परंतु त्याच वेळी आई-वडील आणि मुले यांच्यातील संवाद दुर्मिळ होत चालला आहे.
आपली मुले काय करतात, ती कोणाच्या संगतीत आहेत याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. अशी मुले एकलकोंडी बनण्याची आणि व्यसनांकडे वळत आहेत.