मुंबईत पकडले १५ कोटींचे कोकेन; २ परदेशी नागरिकांना अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश
By मनोज गडनीस | Published: November 13, 2023 06:29 PM2023-11-13T18:29:02+5:302023-11-13T18:29:15+5:30
अटक करण्यात आलेली व्यक्ती ही आफ्रिका खंडातील झांबिया देशाची नागरिक आहे.
मुंबई - नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यरोच्या (एनसीबी) मुंबईतील अधिकाऱ्यांनी अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला असून मुंबईत एका हॉटेलमध्ये केलेल्या छापेमारी दरम्यान दोन किलो कोकेन जप्त केले आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १५ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांनी सांगितले की, या कोकेनचा पुरवठा दक्षिण अमेरिकेतून झाला असून याच्या तस्करीकरिता आफ्रिकन ड्रग माफियांच्या मदतीने ते भारतात आणण्यात आले. या प्रकरणाची व्याप्ती मुंबई, दिल्ली, बंगळुरू, गोवा आदी शहरांपर्यंत पोहोचली आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अनेक पार्ट्यांचे आयोजन होते. या पार्ट्यांसाठी हे ड्रग्ज मुंबईत आले होते.
या प्रकरणी मुंबईत अटक करण्यात आलेली व्यक्ती ही आफ्रिका खंडातील झांबिया देशाची नागरिक आहे. एल.ए.गिलमोर असे तिचे नाव असून ती व्यक्ती मुंबईत आल्यानंतर एका हॉटेलमध्ये राहायला गेली. तिच्याकडे अंमली पदार्थ असल्याची निश्चित माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली व त्यानंतर त्यांनी त्या हॉटेलमध्ये छापेमारी केली. त्या व्यक्तीच्या बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत हे कोकेन दडविल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले. गिलमोर ही व्यक्ती मुंबईत येण्यापूर्वी इथियोपियातील आदिस अबाबा येथे देखील अंमली पदार्थ पोहोचवून आल्याची माहिती त्याच्या चौकशीदरम्यान पुढे आली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे दिल्लीतून आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. एम.आर. ऑगस्टिनो असे या व्यक्तीचे नाव असून ती व्यक्ती आफ्रिक खंडातील टांझानिया देशाची नागरिक आहे.