लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी चार विविध प्रकरणांत मिळून मुंबई विमानतळावर तसेच मुंबईतील एका घरातून मिळून तब्बल ७० कोटी रुपये मूल्याचे कोकेन पकडले आहे. ७ किलो वजनाच्या या कोकेनप्रकरणी एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये दोन भारतीय नागरिक व दोन परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यामध्ये एका महिलेचादेखील समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नैरोबी येथून प्रामुख्याने या कोकेनची तस्करी झाली आहे. यापैकी नैरोबी येथून आलेले कोकेन मुंबईत विरार येथे वास्तव्यात असलेल्या एका व्यक्तीच्या घरातून पकडण्यात आले आहे. तर, दोन प्रकरणांमध्ये प्रवासी बॅगेमध्ये बनावट कप्पे तयार करत त्यामध्ये हे कोकेन लपविण्यात आले होते.
तिसऱ्या प्रकरणात एका व्यक्तीने कोकेन दडविलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या. त्यालाही अटक करण्यात आली असून त्याला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकत्रित कोकेनचे वजन ७ किलो इतके आहे.