टाझानिया नागरिकांच्या पोटातून काढले १३.३५ कोटींचे कोकेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:53+5:302021-04-30T04:08:53+5:30
डीआरएने घेतले ताब्यात; जे. जे. रुग्णालयात केली शस्त्रक्रिया लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन ...
डीआरएने घेतले ताब्यात; जे. जे. रुग्णालयात केली शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोन टांझानिया नागरिकांना अटक करून त्यांच्याकडील २.२२ किलो कोकेन जप्त करण्यात महसूल संचालनालयाच्या गुप्त वार्ता विभागाला (डीआरए) यश आले आहे. ड्रग्जच्या आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत १३ कोटी ३५ लाख असल्याचे सांगण्यात येते. मतवाजी कार्लोस अँडम आणि रशीद पौल सायला अशी त्यांची नावे असून, जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करून पोटात लपविलेले ड्रग्ज जप्त केले आहे.
वैद्यकीय कारणांस्तव दोघांनी भारताचा व्हिसा मिळविला होता. टांझानियाहून ते २२ एप्रिलला मुंबईत आले होते. डीआरएच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संशयास्पद हालचालीवरून ताब्यात घेतले. तपासणीवेळी ते पोटात दुखत असल्याचा बहाणा करू लागले. त्यामुळे संशय बळावल्याने अधिकाऱ्यांनी त्यांना जे. जे. रुग्णालयात नेले. तेथे दोघांवर शस्त्रक्रिया करून त्यांनी पाेटात लपवलेल्या कोकेनच्या गोळ्या जप्त केल्या.